४ लाख ८० हजार मुला-मुलींना देणार जंतनाशक गोळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:35 IST2021-03-04T04:35:18+5:302021-03-04T04:35:18+5:30

लातूर : वैयक्तिक तसेच परिसर स्वच्छतेच्या अभावामुळे बालकांमध्ये जंताचा प्रादुर्भाव होतो. परिणामी, रक्ताक्षय, कुपोषण व बालकांची बौद्धिक व ...

4 lakh 80 thousand boys and girls will be given deworming tablets | ४ लाख ८० हजार मुला-मुलींना देणार जंतनाशक गोळ्या

४ लाख ८० हजार मुला-मुलींना देणार जंतनाशक गोळ्या

लातूर : वैयक्तिक तसेच परिसर स्वच्छतेच्या अभावामुळे बालकांमध्ये जंताचा प्रादुर्भाव होतो. परिणामी, रक्ताक्षय, कुपोषण व बालकांची बौद्धिक व शारीरिक वाढ खुंटते. त्यावर उपाय म्हणून जंतनाशक गोळ्या दिल्या जातात. त्यानुसार जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविली जात असून, १ ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना जंतनाशक गोळ्या दिल्या जात आहेत. मात्र काही ठिकाणी कोरोनाचा अडसर या मोहिमेला दिसून येत आहे.

जिल्ह्यातील शाळा व अंगणवाडीमध्ये वर्षातून दोनदा राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविली जाते. जिल्ह्यात अंगणवाडी, शाळा व शाळाबाह्य असे एकूण ४ लाख ७९ हजार ९२० मुला-मुलींना गोळ्या देण्याचे नियोजन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

१ ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. जिल्ह्यात २०११ शाळातील ३ लाख २७ हजार ५१९ मुला-मुलींना जंतनाशक गोळ्या दिल्या जाणार आहेत. तर अंगणवाडीतील १ लाख ४९ हजार ३८२ आणि शाळाबाह्य २ हजार ९३६ मुलांना आशा स्वयंसेविकेमार्फत जंतनाशक गोळ्या दिल्या जाणार आहेत.

जिल्ह्यात १ मार्चपासून जंतनाशक मोहीम राबविली जात असून, शाळा, अंगणवाडीस्तरावर गोळ्या वाटप केल्या जात आहेत. तसेच आशा स्वयंसेविकांमार्फत घरोघरी जाऊन लहान बालकांना या मोहिमेत सहभागी करून घेतले जात आहे. मात्र ग्रामीण भागात कोरोनाच्या भीतीमुळे या मोहिमेला अडसर येत आहे.

घरोघरी जाऊन होणार वाटप

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे. बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबविला जात आहे. आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन १ ते ६ वयोगटातील बालकांना जंतनाशक गोळ्या दिल्या जात आहेत. या मोहिमेला चांगला प्रतिसाद असून, उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल सुरू आहे. जिल्हास्तरीय मोहिमेला लातूर तालुक्यातील कातपूर येथून जि.प. उपाध्यक्षा भारतबाई सोळुंके, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांचा यामध्ये उत्स्फूर्त सहभाग असून, जिल्ह्यातील दहाही तालुक्यात या उपक्रमाची प्रभावी अंलबजावणी केली जात असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

आरोग्य विभागाच्या वतीने आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका यांना योग्य ते प्रशिक्षण देण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचनेनुसार मातीतून प्रसार होणाऱ्या कृमींचा प्रसार रोखण्यासाठी जंतनाशक मोहीम राबविली जाते. ग्रामीणस्तरावर या मोहिमेसाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, लहान बालकांना घरोघरी जाऊन जंतनाशक गोळ्या दिल्या जात आहेत. जवळपास ४ लाख ७९ हजार ९२० मुला-मुलींना जंतनाशक गोळ्या देण्याचे उद्दिष्ट जि.प.च्या आरोग्य विभागासमोर आहे.

Web Title: 4 lakh 80 thousand boys and girls will be given deworming tablets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.