२ हजार ५० चाचण्यांमध्ये आढळले ३५ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:15 IST2021-07-01T04:15:11+5:302021-07-01T04:15:11+5:30
लातूर : जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या घटत असून, बुधवारी घेतलेल्या २ हजार ५० चाचण्यांमध्ये फक्त ३५ बाधित रुग्ण आढळले आहेत. ...

२ हजार ५० चाचण्यांमध्ये आढळले ३५ रुग्ण
लातूर : जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या घटत असून, बुधवारी घेतलेल्या २ हजार ५० चाचण्यांमध्ये फक्त ३५ बाधित रुग्ण आढळले आहेत. आता बाधितांच्या आलेख ९० हजार ५२९ वर पोहोचला असून, यातील सत्य ८७ हजार ९३२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर सद्यस्थितीत फक्त १९४ रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत २ हजार ४०३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत बुधवारी ७४९ व्यक्तींची चाचणी करण्यात आली. त्यात १७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तर २,२०२ व्यक्तींची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. त्यात १८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दोन्ही चाचण्या मिळून ३५ नव्या रुग्णांची भर पडली आहे. गेल्या काही दिवसापासून रुग्णसंख्या घटत असल्याने दिलासा मिळाला आहे. पॉझिटिव्हिटी रेटमध्येही घट झाली आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट ३ टक्क्याच्या खाली आहे. मृत्यूच्या प्रमाणातही घट झाली आहे. यामुळे लातूरकरांना दिलासा मिळाला आहे. नव्या ३५ रुग्णांची भर पडली तर, ६१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या उपचार घेत असलेल्या १९४ रुग्णांपैकी एक रुग्ण गंभीर मेकॅनिकल व्हेंटिलेटरवर, ११ रुग्ण व्हेंटिलेटरवर आणि ४३ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. उर्वरित रुग्ण सौम्य लक्षणाची आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर लक्ष्मण देशमुख यांनी दिली.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.७ टक्के असून, रुग्ण दुपटीचा कालावधी ६१० दिवसावर आला आहे. यामुळे मोठा दिलासा लातूरकरांना मिळाला आहे. मृत्यूचे प्रमाण मात्र गेल्या अनेक दिवसापासून २.६ टक्के आहे. सदर प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. रुग्णसंख्या कमी होत असली तरी नागरिकांनी नियमित मास्क, सुरक्षित अंतर आणि वारंवार हात धुवावेत, या त्रिसूत्रीचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक यांनी केले आहे.