३ हजार ८०० मेट्रिक टन रासायनिक खताची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:28 IST2021-06-16T04:28:05+5:302021-06-16T04:28:05+5:30

शिरूर अनंतपाळ : शिरूर अनंतपाळ तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने खरीप हंगामातील पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. यंदा २८ हजार ...

3 thousand 800 metric tons of chemical fertilizer required | ३ हजार ८०० मेट्रिक टन रासायनिक खताची गरज

३ हजार ८०० मेट्रिक टन रासायनिक खताची गरज

शिरूर अनंतपाळ : शिरूर अनंतपाळ तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने खरीप हंगामातील पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. यंदा २८ हजार ३८५ हेक्टरवर खरिपाचा पेरा होणे अपेक्षित असून, त्यासाठी ३ हजार ८७६ मेट्रिक टन रासायनिक खताची आवश्यकता आहे. ऐन पेरणीच्या कालावधीत खताचा तुटवडा जाणवू नये म्हणून ३ हजार ४३९ मेट्रिक टन खताची उपलब्धता करण्यात आली आहे.

शिरूर अनंतपाळ तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र ३१ हजार २०८ हेक्टर असले तरी लागवडीसाठी उपयुक्त जमीन २९ हजार ७०० हेक्टर आहे. त्यापैकी ५ हजार हेक्टर बागायती जमीन असल्याने साधारणपणे २८ हजार ५०० हेक्टरवर खरिपाची पेरणी करण्यात येते. यंदाच्या खरिपाचा कृती आराखडा तालुका कृषी कार्यालयाकडून तयार करण्यात आला असून, २८ हजार ३८५ हेक्टरवर पेरा होणे अपेक्षित आहे. तालुक्यातील मातीत नायट्रोजनचे प्रमाण जास्त असल्याने बहुतांश शेतकरी सोयाबीनचा पेरा करतात. सोयाबीन हे नगदी पीक आहे. यंदा सोयाबीनला ७ हजारांपेक्षा अधिक भाव मिळाल्याने शेतकरी सोयाबीनकडे वळले आहेत. त्यामुळे एकूण लागवडी क्षेत्राच्या ८० टक्के जमिनीवर सोयाबीनची लागवड होणार असल्याचे कृती आराखड्यात दर्शविण्यात आले आहे.

२३ हजार ५०० हेक्टरवर सोयाबीन...

खरीप हंगामाच्या कृती आराखड्यातील २८ हजार ३८५ हेक्टरपैकी २३ हजार ५०० हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होणार आहे. उर्वरित ३ हजार ७५० हेक्टरवर तूर, ३३० हेक्टरवर उडीद, २१० हेक्टरवर मूग आणि १७५ हेक्टरवर हायब्रीड ज्वारीची पेरणी अपेक्षित आहे. लागवडीच्या ८० टक्के क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा होणार आहे.

१७ हजार ६२५ क्विंटल बियाणे...

खरिपात सोयाबीनचा पेरा सर्वाधिक म्हणजे २३ हजार ३८५ हेक्टरवर होणार असून, त्यासाठी १७ हजार ६२५ क्विंटल बियाणांची गरज आहे. त्यामुळे बियाणे कंपन्यांवर अवलंबून न राहता १३ हजार ५८८ क्विंटल घरगुती बियाणांचा वापर करण्यात येणार आहे. केवळ ३०० क्विंटल बियाणे बाजारपेठेतून खरेदी होणार आहे.

३ हजार ४३९ मेट्रिक टन खत उपलब्ध...

तालुक्यात खरीप पेरणीसाठी ३ हजार ८७६ मेट्रिक टन रासायनिक खताची गरज लक्षात घेऊन तालुका कृषी कार्यालयाकडून ऐन पेरणीच्या कालावधीत खताचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून ३ हजार ४३९ मेट्रिक टन खत उपलब्ध करण्यात आले आहे. उर्वरित खताचे आवंटन मंजूर करण्यात आले असल्याचे तालुका कृषी अधिकारी संजय नाबदे, कृषी अधिकारी शिवप्रसाद वलांडे यांनी सांगितले.

डीएपी, युरिया खताचा तुटवडा...

तालुका कृषी कार्यालयाकडून खताच्या उपलब्धतेबाबत नियोजन करण्यात आले असले तरी, सोयाबीनच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार डीएपी खताचा बाजारपेठेत तुटवडा आहे. तसेच युरिया खतही मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना नाइलाजास्तव अन्य खताचा पर्याय निवडावा लागत आहे. त्यामुळे डीएपी, युरिया ही खते उपलब्ध करून देण्यात यावीत, अशी मागणी धोंडिराम कारभारी, संजीव गुणाले, विठ्ठलराव पाटील यांच्यासह तालुक्यातील शेतकऱ्यांतून होत आहे.

Web Title: 3 thousand 800 metric tons of chemical fertilizer required

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.