लातूर मनपासाठी ३ लाख २१ हजार मतदार १८ प्रभागातून ७० सदस्य निवडणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 16:20 IST2025-12-20T16:17:49+5:302025-12-20T16:20:02+5:30
कोणत्या प्रभागात किती मतदार हक्क बजावणार हे निश्चित झाल्याने इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत.

लातूर मनपासाठी ३ लाख २१ हजार मतदार १८ प्रभागातून ७० सदस्य निवडणार
लातूर : महापालिका निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झाली असून एकूण १८ प्रभागातून ७० सदस्य निवडले जाणार आहेत. यासाठी एकुण ३ लाख २१ हजार ३५४ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. निवडणूक विभागाकडून मतदारांची अंतिम यादी जाहिर करण्यात आली आहे. कोणत्या प्रभागात किती मतदार हक्क बजावणार हे निश्चित झाल्याने इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत. आचारसंहिता घोषित होताच मनपाकडून शासकीय पोस्टर्स, फलक झाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
अनेक दिवसांपासून निवडणुकीच्या प्रतिक्षेत असलेल्या इच्छुकांनी आता जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. सण, उत्सव, जयंती, वाढदिवस आदी कार्यक्रमातून निवडणुकीची साखर पेरणी करणाऱ्यांचे लक्ष निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे लागले होते. निवडणुकीची घोषणा होताच इच्छुकांनी तातडीने आपापल्या प्रभागात भेटी सुरू केल्या आहेत. प्रमुख राजकीय पक्षांनी अगोदरच इच्छुकांचे अर्ज घेतले आहेत. त्यात भारतीय जनता पक्षाच्या इच्छुक असलेल्या जवळपास ९०० उमेदवारांनी मुलाखतीही दिल्या आहेत. काँग्रेसने अर्ज घेतले असून त्यांच्या मुलाखती काँग्रेस भवन येथे १७ व १८ डिसेंबर रोजी घेतल्या जाणार आहेत. याशिवाय, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), शिवसेना (उद्धव ठाकरे), शिवसेना (एकनाथ शिंदे), वंचित बहुजन आघाडी, एएमआयएमनेही निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. इच्छुक कार्यकर्त्यांकडून उमेदवारी मागणीचे अर्जही भरून घेण्यात आले आहेत. काही प्रभागात नवीन इच्छुकांची संख्या वाढली असल्याचे पाहून पक्षांतरही होत आहेत.
२० डिसेंबरपूर्वी बूथनिहाय मतदार निश्चित होणार...
लातूर शहर महापालिका निवडणुकीत १८ प्रभाग आहेत. येथून ७० सदस्य निवडून येणार आहेत. यासाठी प्रभाग क्रमांक एक, चार, आठ आणि नऊ या चार प्रभागात २० हजारांवर मतदारांचा समावेश आहे. १५ डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द झाल्याने कोणत्या प्रभागात किती मतदार हक्क बजावणार हे निश्चित झाले आहे. निवडणूक विभागाकडून २० डिसेंबरपूर्वी बुथनिहाय मतदार संख्या निश्चित केली जाणार आहे.
जाहिरात फलक हटविण्याचे काम...
महापालिका निवडणुकीची आचारसंहिता जाहिर होताच महापालिका प्रशासनाच्या वतीने शहराच्या हद्दीत असलेले शासकीय कामाचे फलक, पोस्टर हटविण्याचे काम हाती घेतले आहे. २४ तासांत तब्बल २३० पेक्षा अधिक फलक, पोस्टर काढण्यात आले आहेत. काही ठिकाणचे फलक झाकण्यात येत असून काही ठिकाणी काढूनच टाकले जात आहेत.
सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची बैठक...
महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यामार्फत अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यात चार झोनमध्ये प्रत्येकी एक असे उपजिल्हाधिकारी दर्जाचे ४ अधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निश्चित केले आहेत. तसेच त्यांना सहाय्यक म्हणून तहसीलदार, मनपाचे दोन अधिकारी निवडण्यात आले आहेत. मंगळवारी या अधिकाऱ्यांची पहिली बैठक झाली आहे.
कोणत्या प्रभागातून किती मतदार...
प्रभाग क्रमांक. मतदार
१ - २०,३१०
२ - १८,६२६
३ - १७८२०
४ - २०,२४८
५ - १६,९८६
६ - १७,०८५
७ - १७,९८६
८ - २०,५९४
९ - २०,५५३
१०- १९,२४०
११ - १७,५४३
१२ - १९,३२९
१३ - १७,७७१
१४ - १६८८६
१५ - १७,८४१
१६ - १५,४२७
१७ - १४,६३४
१८ - १२,४७५
एकूण मतदार : ३ लाख २१ हजार ३५४.