लातुरात महिलांच्या शोले स्टाइल आंदोलनाचे २७ तास; मनधरणीनंतरही आंदोलक मागण्यांवर ठाम
By आशपाक पठाण | Updated: October 30, 2023 18:28 IST2023-10-30T18:27:46+5:302023-10-30T18:28:19+5:30
जोपर्यंत राज्य शासन आरक्षण जाहीर करीत नाही, तोपर्यंत आपण आंदोलनावर ठाम असल्याचे सांगितले.

लातुरात महिलांच्या शोले स्टाइल आंदोलनाचे २७ तास; मनधरणीनंतरही आंदोलक मागण्यांवर ठाम
लातूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लातूर शहरातील महात्मा गांधी चौकात पाण्याच्या टाकीवर चढून बसलेल्या महिलांनी शोले स्टाइल आंदोलन सुरू केले आहे. रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जवळपास ७० फूट उंचीवर जाऊन बसलेल्या महिला आंदोलक आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहेत. दरम्यान, उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांनी मनधरणी केली तरीही आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत.
मराठा आरक्षणासाठी राज्य शासनाने दिलेली डेडलाइन पाळली नाही. त्यामुळे अंतरवाली येथे मनोज जरांगे पाटील यांनी अमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभर विविध आंदोलने केली जात आहेत. रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास काही महिलांनी गांधी चौकातील पाण्याच्या टाकीवर जवळपास ७० फूट उंचीवर चढून आरक्षणाच्या मागणीसाठी घोषणाबाजी सुरू केली. दरम्यान, महिला टाकीवर चढून आंदोलन करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच या ठिकाणी बंदोबस्त वाढविण्यात आला. २७ तास उलटून गेले तरीही महिला खाली उतरत नसल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
रात्री २:३० वाजता प्रशासनाची मनधरणी...
गांधी चौकातील पाण्याच्या टाकीवर बसलेल्या आंदोलक स्वाती जाधव, स्वयंप्रभा पाटील, मीरा देशमुख, सुनीता डांगे या महिलांची रात्री २:३० वाजता उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे, तहसीलदार सौदागर तांदळे, गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकाडे यांनी भेट घेतली. आपल्या मागण्या शासनापर्यंत तातडीने पोहोचविल्या जातील, असे आश्वासन प्रशासनाने दिल्यावरही आंदोलकांनी माघार घेतली नाही. जोपर्यंत राज्य शासन आरक्षण जाहीर करीत नाही, तोपर्यंत आपण आंदोलनावर ठाम असल्याचे सांगितले.