६८६० रुग्णांवर मोफत उपचार करून वाचविले २७ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:15 IST2021-07-15T04:15:35+5:302021-07-15T04:15:35+5:30
मनपाने समाज कल्याणचे वसतिगृह आणि पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये कोविड केअर सेंटर सुरू केली. या केंद्रामधून बाधित रुग्णावर मोफत ...

६८६० रुग्णांवर मोफत उपचार करून वाचविले २७ कोटी
मनपाने समाज कल्याणचे वसतिगृह आणि पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये कोविड केअर सेंटर सुरू केली. या केंद्रामधून बाधित रुग्णावर मोफत उपचार करण्यात आले. विलगीकरणासह ऑक्सिजन बेडची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली होती. तज्ज्ञ डॉक्टर्स आणि नर्सिंग स्टाफ पालिकेने पुरवला होता. शहर व परिसरातील ६८६० रुग्णांनी या दोन केंद्रांमधून उपचार घेतले. शहरासह जिल्ह्यातील नागरिकांना याचा लाभ झाला. समाज कल्याणच्या वसतिगृहात १ हजार ५३५ तर पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन मध्ये ५ हजार ३२५ बाधित रुग्णांवर उपचार करण्यात आले.
रुग्णांवर योग्य पद्धतीने उपचार व्हावेत, यासाठी महानगरपालिका सातत्याने प्रयत्नशील होती. उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांना संपूर्ण वैद्यकीय उपचार व औषधी तर मोफत देण्यात आलीच. शिवाय रक्त तपासणीसाठीही शुल्क आकारण्यात आले नाही. रुग्णांना एक वेळ नाश्ता, काढा तसेच दोन वेळचे पौष्टिक जेवणही मोफतच देण्यात आले. कोरोना संक्रमणाचा काळ पाहता वैद्यकीय उपचार महागले होते. अशा स्थितीत बाधित रुग्णांनी हेच उपचार खासगी रुग्णालयात घेतले असते तर त्यांना सुमारे २७ कोटी रुपये खर्च आला असता. आर्थिक अडचणीत असतानाही लातूर महानगरपालिकेने या सर्व सुविधा अगदी मोफत उपलब्ध करून दिल्यामुळे लातूरकरांचे २७ कोटी रुपये वाचले आहेत.
नागरिकांच्या आरोग्यास प्राधान्य...
कोरोना संकटाच्या काळात शहरातील प्रत्येक नागरिक सुदृढ रहावा यासाठी मनपा प्रयत्नशील होती. कोरोनाची बाधा झाली तरी नागरिकांना योग्य उपचार, तेही मोफत मिळावेत यासाठी मनपाने कोविड केअर सेंटर सुरू केली होती. या माध्यमातून बाधित रुग्णांवर योग्य पद्धतीने उपचार करून त्यांना दिलासा देता आला याचे समाधान असल्याचे मत महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी व्यक्त केले.