डाेळ्यात मिरची पूड टाकून २६ ताेळे दागिने लुटल्याचा बनाव; सराफ अडकला जाळ्यात
By राजकुमार जोंधळे | Updated: December 25, 2024 22:38 IST2024-12-25T22:37:56+5:302024-12-25T22:38:07+5:30
लातुरात गुन्हा दाखल : पाेलिसांच्या उलट तपासणीत फुटले बिंग...

डाेळ्यात मिरची पूड टाकून २६ ताेळे दागिने लुटल्याचा बनाव; सराफ अडकला जाळ्यात
राजकुमार जाेंधळे / लातूर : डोळ्यात मिरची पूड टाकून २६ तोळे सोन्याचे दागिने लुटल्याचा बनाव करणे लातुरातील एका सराफाला चांगलेच अंगलट आले. पाेलिसांनी केलेल्या उलट तपासणीत या सराफा व्यापाऱ्याच्या बनावाचे बिंग फुटले आणि ताेच जाळ्यात अडकला. याबाबत लातूर ग्रामीण पाेलिस ठाण्यात त्या सराफाविराेधात गुन्हा दाखल केला आहे.
पाेलिसांनी सांगितले की, २३ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास लातूर येथील सराफा अमर अंबादास साळुंके (वय ३१, रा. पोचम्मा गल्ली, लातूर) हे लातूर ग्रामीण पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. साेमवारी सायंकाळी सराफ लाइन, लातूर येथील एका दुकानातून २० लाख ४६ हजारांचे २६ तोळे सोन्याचे दागिने दुचाकीच्या डिकीत घेऊन नेहमीप्रमाणे ग्राहकांना दाखविण्यासाठी रेणापूर येथे गेलो होतो. दरम्यान, परतताना सायंकाळी साडेसहा वाजता रेणापूर-लातूर मार्गावर कातळेनगरनजीक दुचाकीवरून आलेल्या दोघांनी डोळ्यात मिरची पूड टाकून माझ्याजवळील २६ तोळे दागिने घेत पसार झाले. अशा आशयाची तक्रार त्यांनी दिली. तक्रारीचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखा व लातूर ग्रामीण ठाण्याची पथके तातडीने घटनास्थळी रवाना झाली. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर तक्रारदार अमर साळुंकेची अधिक विचारपूस केली. घडलेली घटना व अमर साळुंके सांगत असलेल्या माहितीत विसंगती हाेती. यातून पाेलिसांचा संशय वाढला अन् अमर साळुंके याचीच उलटतपासणी केली. याबाबत लातूर ग्रामीण पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई चाकूर-लातूर ग्रामीणचे सहायक पाेलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, स्थागुशाचे पो.नि. संजीवन मिरकले, सपोनि विश्वंभर पल्लेवाड, अंमलदार मोहन सुरवसे, प्रदीप स्वामी, नितीन कठारे, मनोज खोसे, सचिन मुंडे, लातूर ग्रामीण ठाण्याचे पो.नि. अरविंद पवार, पाेउपनि मोरे, अंमलदार चौगुले, चंद्रपाटले, दरोडे यांच्या पथकाने केली.
कर्जबाजारी झाल्याने रचला लुटीचा बनाव...
मी कर्जबाजारी झाल्याने दागिने चोरीचा बनाव रचला. यामधून माझा आर्थिक फायदा करून घेण्यासाठी हे कथानक पाेलिसांना सांगितले, अशी कबुली दिली. शिवाय, रेणापूर-लातूर रस्त्यालगत असलेल्या एका शेतात खड्डा करून ते २६ ताेळ्याचे दागिने पुरून ठेवले हाेते. पाेलिसांनी ते दागिने जप्त केले आहेत.