लातूर मनपा निवडणुकीसाठी अडीच हजार कर्मचारी, उमेदवारी अर्जांसाठी ६ ठिकाणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 11:10 IST2025-12-20T11:07:43+5:302025-12-20T11:10:02+5:30
२३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज विक्री-स्वीकृती सुरू होणार आहे.

लातूर मनपा निवडणुकीसाठी अडीच हजार कर्मचारी, उमेदवारी अर्जांसाठी ६ ठिकाणे
लातूर : लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मनपाने जवळपास अडीच हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. शिवाय, उमेदवारांची गैरसोय होणार नाही, यासाठी वेगवेगळ्या २२ कक्षांची स्थापना करून कामाची विभागणी केली आहे. प्रत्येकी तीन प्रभागांसाठी एक निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे. त्यासाठी १८ प्रभागांसाठी ६ निवडणूक निर्णय अधिकारी असून, त्यांची कार्यालयेही निश्चित झाली आहेत. त्याच ठिकाणी उमेदवारी अर्ज भरावा लागणार असल्याची माहिती मनपा आयुक्त मानसी मीना यांनी पत्रपरिषदेत दिली. २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज विक्री-स्वीकृती सुरू होणार आहे.
मतदारांची अंतिम यादी निश्चित झाल्यानंतर आता मतदान केंद्र निश्चिततेचे काम सुरू आहे. शिवाय, आचारसंहिता कक्ष, खर्च नियंत्रण, स्थिर निगराणी पथक, भरारी पथक यासह प्रचारसभा, रॅलींसाठी चित्रीकरण करणारी टीमही नियुक्त केली आहे. लातूर शहरातील अंबाजोगाई रोड, बार्शी रोड, औसा रोड, बाभळगाव रोड, नांदेड रोड अशा पाच ठिकाणी स्थिर निगराणी पथक असणार आहे. पत्रपरिषदेस अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव, उपायुक्त वसुधा फड, डॉ. पंजाब खानसोळे, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांची उपस्थिती होती.
शासकीय तंत्रनिकेतन येथे स्ट्राँगरूम
मनपा निवडणुकीसाठी लागणाऱ्या मतदान यंत्राची साठवणूक तसेच स्ट्राँगरूम बार्शी रोडवरील शासकीय महिला तंत्रनिकेतन येथे उभारली जात आहे. यासाठीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शिवाय, मतदान यंत्रे घेऊन जाण्यासाठी लागणारी वाहनेही निश्चित केली जात आहेत.
ऑफलाइन पद्धतीने उमेदवारी अर्ज
मनपा निवडणुकीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. प्रत्येक तीन प्रभागांसाठी एक निवडणूक निर्णय अधिकारी असल्यामुळे सहा ठिकाणी त्यांना निश्चित करून दिलेल्या प्रभागातील उमेदवारांना अर्ज दाखल करता येईल. यामुळे गर्दीही होणार नाही. आरक्षित जागेवर अर्ज दाखल करताना सोबत जात वैधता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. किंवा अर्जासाठी दाखल केलेले कागदपत्र जोडून सहा महिन्यांत त्याची पूर्तता करणे बंधनकारक असल्याचे आयुक्त मानसी मीना म्हणाल्या.
सूचक, अनुमोदक वॉर्डातलाच
उमेदवारांना अर्ज दाखल करीत असताना सूचक, अनुमोदक हे आपल्याच प्रभागातील असणे आवश्यक आहे. सूचक, अनुमोदकासमोर मतदार यादीतील क्रमांक नमूद करणे गरजेचे आहे. दुसऱ्या प्रभागातील सूचक, अनुमोदक चालणार नाहीत. मतदार यादीतील नाव व क्रमांक शोधण्यासाठी अत्यंत सोप्या पद्धतीचे सॉफ्टवेअर असल्याचे सांगण्यात आले.
स्वीप कक्षाची स्थापना
मनपाच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीपेक्षा अधिक मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी स्वीपअंतर्गत जनजाजगृती मोहीम राबविली जाणार आहे. यासाठी कार्यक्रम निश्चित करण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले. जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावा, यासाठी मोहीम राबविली जाणार आहे.