जळकोटात ऑक्सिजनयुक्त २५ खाटा, व्हेंटिलेटरची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:19 IST2021-05-10T04:19:15+5:302021-05-10T04:19:15+5:30

जळकोट तालुका हा डोंगरी असल्याने येथे सुविधा अल्प प्रमाणात आहेत. तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढला होता. अशा परिस्थितीत गंभीर रुग्णांना ...

25 oxygen bed, ventilator facility in Jalkot | जळकोटात ऑक्सिजनयुक्त २५ खाटा, व्हेंटिलेटरची सुविधा

जळकोटात ऑक्सिजनयुक्त २५ खाटा, व्हेंटिलेटरची सुविधा

जळकोट तालुका हा डोंगरी असल्याने येथे सुविधा अल्प प्रमाणात आहेत. तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढला होता. अशा परिस्थितीत गंभीर रुग्णांना उदगीर, लातूरला उपचारासाठी पाठविण्यात येत होते. येथे ऑक्सिजनयुक्त खाटा नसल्याने परवडत होत होती. दरम्यान, यासंदर्भात ‘लोकमत’ने वारंवार वृत्त प्रकाशित केल्याने त्याची आरोग्य विभागाने दखल घेतली आहे. तसेच राज्यमंत्री संजय बनसोडे, आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले यांच्या आदेशानुसार येथील ग्रामीण रुग्णालयासाठी १ व्हेंटिलेटर, ऑक्सिजनयुक्त २५ खाटा आणि एका तज्ज्ञ डॉक्टराची नियुक्ती करण्यात आली आहे. आरोग्य विभागाने जिल्ह्यामध्ये एकमेव ग्रामीण रुग्णालयात व्हेंटिलेटर मशीन उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे रुग्णांची परवड थांबणार आहे.

सध्या जळकोटच्या शासकीय मुलींच्या वसतिगृहात १६० खाटांचे कोविड सेंटर सुरू आहे. त्यामुळे तालुक्यातील रुग्णांना अन्यत्र उपचारासाठी जाण्याची गरज भासणार नाही. या सुविधा उपलब्ध होण्यासाठी बाजार समितीचे माजी सभापती मन्मथप्पा किडे, काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष मारुती पांडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष महेश शेटे, नगरसेवक शिवानंद देशमुख, माजी नगराध्यक्ष उस्मान मोमीन, खादरभाई लाटवाले, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संगम टाले, प्रशांत देवशेट्टे, महेताब बेग आदींनी सातत्याने पाठपुरावा केला होता.

आतापर्यंत तालुक्यात १३ हजार ६५ जणांची चाचणी

जळकोट तालुक्यात आतापर्यंत १३ हजार ६५ जणांची कोविड चाचणी करण्यात आली. त्यात १ हजार ६१६ जण पॉझिटिव्ह आढळून आले. उपचारानंतर १ हजार ४८५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या तालुक्यात ९९ ॲक्टिव्ह रुग्ण असून कोरोनामुळे आतापर्यंत ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. गृहविलगीकरणात ५० जण उपचार घेत आहेत, तर २३ जणांना उदगीर, लातूरला रेफर करण्यात आले आहे, अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. जगदीश सूर्यवंशी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पवार यांनी दिली.

जळकोट शहरात आता केवळ १५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. शनिवारी दिवसभरात केवळ ३ बाधित आढळले. गत आठवड्यापासून कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे.

Web Title: 25 oxygen bed, ventilator facility in Jalkot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.