संचारबंदीच्या काळात २४ हजार पाॅझिटिव्ह रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:09 IST2021-05-04T04:09:35+5:302021-05-04T04:09:35+5:30

लातूर : संचारबंदीच्या १५ एप्रिल ते १ मे या कालावधीत ८० हजार ५२९ चाचण्या करण्यात आल्या असून, त्यात २४ ...

24,000 positive patients during the curfew | संचारबंदीच्या काळात २४ हजार पाॅझिटिव्ह रुग्ण

संचारबंदीच्या काळात २४ हजार पाॅझिटिव्ह रुग्ण

लातूर : संचारबंदीच्या १५ एप्रिल ते १ मे या कालावधीत ८० हजार ५२९ चाचण्या करण्यात आल्या असून, त्यात २४ हजार ९०१ बाधित रुग्ण आढळले, तर याच कालावधीत २३ हजार ११९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. गेल्या नऊ दिवसांपासून बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या संख्येत वाढ झाली आहे. तथापि, या नऊ दिवसांत रुग्णसंख्येत किंचित घट आहे.

दरम्यान, ३१ मार्च ते १४ एप्रिल या कालावधीत ५९ हजार १५३ चाचण्या करण्यात आल्या असून, त्यात १५ हजार ५९६ रुग्ण आढळले, तर ७१२० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सदर कालावधीमध्ये बाधितांचे प्रमाण अधिक होते. त्या तुलनेत बरे होऊन घरी परतणाऱ्यांची संख्या कमी होती. मात्र, गेल्या नऊ दिवसांपासून बाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या वाढली आहे.

या तीन कारणांमुळे रुग्णसंख्या घटली

मास्क, सॅनिटायझर आणि फिजिकल डिस्टन्सचे पालन त्याचबरोबर घराबाहेर न पडल्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.

टेस्टिंग, ट्रेसिंग आणि ट्रीट हे तत्त्व अवलंबले. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांमध्ये चाचण्या वाढल्या. बाधितांना वेळेत उपचार मिळाल्याने कोरोनामुक्तांचे प्रमाण वाढत आहे.

संचारबंदीपूर्वी पंधरा दिवसांत ५९,१५३ तर संचारबंदीत ८०,५२९ चाचण्या झाल्या. संचारबंदीपूर्वी १५,५९६ रुग्ण होते. तर कोरोनामुक्त ७ हजार १२० झाले. संचारबंदीतील १५ दिवसांत २४ हजार ९०१ बाधित रुग्ण आढळले, तर २३ हजार ११९ बरे होऊन घरी परतले. चाचण्या वाढल्यामुळे निदान लवकर होऊन वेळेत उपचार मिळाले.

बेफिकिरीमुळे ग्रामीण भागात रुग्ण वाढले

लातूर शहरातील रुग्णसंख्येतही घट झाल्याचे दिसत आहे. १ ते ३० एप्रिल या कालावधीत शहरात १० हजार ४०८ रुग्ण आढळले होते. तर ९ हजार ५०६ रुग्ण बरे होऊन घरी परतले. उपचारादरम्यान १४३ जणांचा मृत्यू झाला. या तुलनेत ग्रामीण भागामध्ये रुग्णसंख्या अधिक आहे. मास्क, फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझर आदी नियमांचे पालन होत नसल्याने ग्रामीण भागात संख्या वाढलेली दिसत आहे; परंतु संचारबंदीनंतर त्यात घट होऊ लागली आहे.

Web Title: 24,000 positive patients during the curfew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.