औसा तालुक्यात जलयुक्तच्या कामात २३ लाखांचा अपहार; चौघांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 19:10 IST2019-12-28T19:09:39+5:302019-12-28T19:10:09+5:30
८ लाख ६० हजार २७८ रुपयांची कामे करून ३१ लाख ५६ हजार ८६१ रुपयांची कामे दाखविली.

औसा तालुक्यात जलयुक्तच्या कामात २३ लाखांचा अपहार; चौघांवर गुन्हा दाखल
किल्लारी (जि़ लातूर) : जलयुक्त शिवार योजनेंतर्गतच्या कुमठा (ता़ औसा) येथील कामात २२ लाख ९६ हजार ६८३ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी एम़एस़ कन्स्ट्रक्शन या कंपनीसह अन्य तिघांविरुद्ध किल्लारी पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
कुमठा येथे जलयुक्त शिवार योजनेंतर्गत सन २०१६-१७ मध्ये कंपार्टमेंट बल्डिंगची कामे करण्यात आली आहेत़ यात एम़एस़ कन्स्ट्रक्शन (धारूर रोड, केज), सय्यद अब्दुल रहेमान पाशा (रा़ लातूर), तत्कालीन कृषी पर्यवेक्षक संदीपान निवृत्ती साबदे, तत्कालीन कृषी सहायक सुनील सुधाकर कुलकर्णी यांनी संगनमत करून ८ लाख ६० हजार २७८ रुपयांची कामे करून ३१ लाख ५६ हजार ८६१ रुपयांची कामे दाखविली. शासनाकडून २२ लाख ९६ हजार ६८३ रुपये जास्तीचे उचलून शासनाची फसवणूक केली. याप्रकरणी तालुका कृषी अधिकारी महारुद्र मोरे यांच्या फिर्यादीवरून वरील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ अधिक तपास सपोनि. म्हेत्रेवार करीत आहेत़
मापन पुस्तिकेत जास्तीचे काम दाखविले
संबंधित कन्स्ट्रक्शन कंपनी आणि अन्य तिघांनी काम ८ लाख ६० हजार २७८ रुपयांचे असताना मापन पुस्तिकेत ३१ लाख ५६ हजार ८६१ रुपयांचे दाखवून २२ लाख ९६ हजार ६८३ रूपये जास्तीचे उचलून अपहार केला़ याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.