रेणा प्रकल्पात १४.७६ टक्के जलसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:23 IST2021-08-27T04:23:47+5:302021-08-27T04:23:47+5:30
रेणापूर : पावसाळ्यातील अडीच महिने उलटले असले तरी तालुक्यातील रेणा मध्यम प्रकल्पात अपेक्षित जलसाठा झाला नाही. पावसाळ्यात केवळ ८ ...

रेणा प्रकल्पात १४.७६ टक्के जलसाठा
रेणापूर : पावसाळ्यातील अडीच महिने उलटले असले तरी तालुक्यातील रेणा मध्यम प्रकल्पात अपेक्षित जलसाठा झाला नाही. पावसाळ्यात केवळ ८ टक्के पाणीसाठा जमा झाला असून सध्या प्रकल्पात १४.७६ टक्के जलसाठा आहे. हा जलसाठा केवळ पाणीपुरवठा योजनेसाठी पुरेल एवढाच आहे. सिंचनासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागून आहे.
रेणापूर तालुक्यासाठी रेणा मध्यम प्रकल्प हा वरदान आहे. मात्र, हा प्रकल्प गेल्या पाच वर्षांत केवळ एकदा पूर्ण क्षमतेने भरला होता. प्रकल्पाची क्षमता २१.६ दलघमी एवढी आहे. प्रकल्पावर रेणापूर तालुक्यातील निम्मी गावे तसेच अंबाजोगाई तालुक्यातील १७ गावांसाठीची जलयोजना आहे. त्याचबरोबर सिंचनासाठी ही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना लाभ होतो. गतवर्षी प्रकल्पात कमी जलसाठा झाला होता. याही वर्षी धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने केवळ यंदा आठ टक्के जलसाठा वाढला असून १४.७६ टक्के झाला आहे.
सध्या प्रकल्पात ४.१५ दलघमी जलसाठा आहे. त्यात ३.२७ दलघमी जिवंत पाणीसाठा आहे. उपलब्ध पाणीसाठा प्रकल्पावर असणाऱ्या पाणी पुरवठा योजनांसाठी पुरेसा आहे. मात्र, शेती सिंचनासाठी उपलब्ध नाही. त्यामुळे प्रकल्प क्षेत्रात मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. पावसाळ्यातील अडीच महिने उलटले आहेत. त्यामुळे यंदा हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरेल की नाही, याची शाश्वती नाही.
रेणा प्रकल्पावरून रेणापूर शहर पूरक पाणी पुरवठा योजना, पानगाव दहा खेडी, बिटरगाव पाच खेडी व अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव १७ खेडी या योजना कार्यान्वित आहेत. प्रकल्पात मे ते जून महिन्यात ६ ते ७ टक्के पाणीसाठा होता. यंदा त्यात ७ ते ८ टक्क्यांची भर पडून १४.७६ टक्के सध्या जलसाठा झाला आहे. या प्रकल्पाच्या भरोशावर परिसरातील शेतकरी उसाची लागवड करतात. जलसाठा कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत.
आतापर्यंत ४९१ मिमी पाऊस...
रेणापूर तालुक्यात पावसाची वार्षिक सरासरी ६३४.९९ मिमी आहे. रेणापूर ६१६, पानगाव ३७९, कारेपूर ५०१, पळशी ५०९, पोहरेगाव ४५२ मिमी असा पाच महसूल मंडळात एकूण सरासरी ४९१.४ मिमी पाऊस झाला आहे. हा पाऊस एकूण सरासरीच्या ८० टक्के झाला आहे. एवढा पाऊस झाला असला तरी अद्याप रेणा मध्यम प्रकल्पात म्हणावा तसा पाणीसाठा झाला नाही.
३.२७ दलघमी जिवंत पाणी...
धरण क्षेत्रात पाऊस कमी झाल्यामुळे रेणा मध्यम प्रकल्पात कमी पाणीसाठा झाला आहे. सध्या प्रकल्पात १४.७६ टक्के साठा उपलब्ध आहे. म्हणजेच एकूण पाणीसाठा हा ४.१५६ दलघमी तर जिवंत पाणीसाठा ३.२७ दलघमी आहे. जलसाठा वाढण्यासाठी या क्षेत्रात मोठ्या पावसाची आवश्यकता आहे, असे रेणा मध्यम प्रकल्पाचे शाखा अभियंता श्रीधर कुलकर्णी यांनी सांगितले.