१०८ रुग्णवाहिकेने आठ महिन्यांत २१ हजार रुग्णांना दिली तत्पर सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:46 IST2020-12-11T04:46:31+5:302020-12-11T04:46:31+5:30
जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार सुविधा मिळावी, यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार जिल्ह्यात १०८ टोलफ्री क्रमांकाच्या ...

१०८ रुग्णवाहिकेने आठ महिन्यांत २१ हजार रुग्णांना दिली तत्पर सेवा
जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार सुविधा मिळावी, यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार जिल्ह्यात १०८ टोलफ्री क्रमांकाच्या २० रुग्णवाहिका कार्यरत आहेत. त्यावर ४५ चालक, तर ३५ डाॅक्टर्स कायम रुग्णांच्या सेवेत आहेत. जिल्ह्यातील लातूर, बाभळगाव, औसा, मुरूड, निलंगा, उदगीर, देवणी, जळकोट, अहमदपूर, शिरूर अनंतपाळ, चाकूर, रेणापूर आदी गावांसह प्राथमिक आरोग्य केंद्र असलेल्या ठिकाणी सदरील रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच रस्त्यावरील अपघातात जखमी झालेल्यांना तात्काळ उपचार मिळावेत, यासाठी स्वतंत्र रुग्णवाहिका तैनात करण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांना आधार आहे.
डॉक्टर, कर्मचाऱ्यांना पुरविल्या सुविधा
n कोरोनाच्या संकट काळात ग्रामीण भागात बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना स्वॅब नमुने घेण्यासाठी रुग्णालयापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी मोफत रुग्णवाहिकेने पार पाडली.
n डाॅक्टर्स, चालकांना पीपीई कीट, मास्क, सॅनिटायझर यासह प्रतिबंधात्मक आवश्यक बाबींची पूर्तता करण्यात आली होती.
सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक रुग्णांना सेवा
कोरोनाच्या संकटकाळात १०८ मोफत रुग्णवाहिकेतील चालक, डाॅक्टरांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते. तसेच चालक, डाॅक्टरांना आरोग्यविषयक सुविधा पुरविण्यात आल्या होत्या. एप्रिलमध्ये ४६६, मे १२४७, जून १८६९, जुलै ४ हजार ९४८, ऑगस्ट ३ हजार ८५४, सप्टेंबर ३ हजार ३४४, ऑक्टोबर ९६९ तर नोव्हेंबर महिन्यात १७१ कोरोना संबंधित रुग्णांना सेवा दिली.
कोरोना काळात शासनाच्या निर्देशानुसार २० रुग्णवाहिकांमार्फत सेवा पुरविण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्सक एल.एस. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड केअर सेंटरसाठी विशेष रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. या आठ महिन्यांच्या कालावधीत २१ हजार रुग्णांना तत्पर सेवा दिली आहे.
- डाॅ. संदीप राजहंस, जिल्हा व्यवस्थापक