महिला बचत गटांना मिळणार १०० कोटींचे कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:14 IST2021-07-10T04:14:52+5:302021-07-10T04:14:52+5:30

लातूर : जिल्ह्यातील सर्व बँकांनी आर्थिक वर्ष २०२०-२१मध्ये उमेद अंतर्गत येणाऱ्या महिला बचत गटांना ५३.५९ कोटी रुपयांचे कर्जवाटप केले ...

100 crore loan for women self help groups | महिला बचत गटांना मिळणार १०० कोटींचे कर्ज

महिला बचत गटांना मिळणार १०० कोटींचे कर्ज

लातूर : जिल्ह्यातील सर्व बँकांनी आर्थिक वर्ष २०२०-२१मध्ये उमेद अंतर्गत येणाऱ्या महिला बचत गटांना ५३.५९ कोटी रुपयांचे कर्जवाटप केले आहे. तर आर्थिक वर्ष २०२१-२२ या वर्षात बँकांनी महिला बचत गटांना १०० कोटींचे कर्जवाटप करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी केले.

लातूर जिल्हा परिषदेच्या सभागृहात महिला बचत गटांना कर्ज पुरवठा करणे, यासाठी आयोजित बँक अधिकाऱ्यांच्या समन्वय बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी गोयल बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संतोष जोशी, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक अनंत कसबे, ‘उमेद’चे जिल्हा समन्वयक देवकुमार कांबळे यांच्यासह बँकांचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी गोयल म्हणाले, महिला बचत गटांची संकल्पना आणि त्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होत आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवून त्यांचे कुटुंबही स्वावलंबी बनत आहे, त्यामुळे अशा महिला बचत गटांना सर्व बँकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कर्ज पुरवठा केला पाहिजे, असे त्यांनी सूचित केले. यासाठी सर्व उपस्थित बँक अधिकाऱ्यांना त्यांनी प्रोत्साहित केले.

जिल्ह्यातील सर्व बँकांनी प्रत्येक महिन्यातील ११ व २१ तारीख महिला बचत गटांच्या कामासाठी राखीव ठेवण्याच्या सूचनाही दिल्या. सर्व बँकर्सनी परस्पर समन्वयातून मार्ग काढून उमेद महिला बचत गटांना बँक सेवा आणि कर्ज पुरवठा करण्यावर अधिक भर देण्याचे निर्देश गोयल यांनी दिले. बँकेंतर्गत स्तरावर गटांचे ६१९ खाते काढणे प्रलंबित प्रस्ताव, कर्ज वाटपाच्या बँक स्तरावर २० कोटी रुपयांच्या प्रलंबित असलेल्या एकूण १,३७९ प्रस्तावांचा बँकनिहाय आढावा घेऊन, हे सर्व प्रस्ताव जुलैअखेर निकाली काढण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी गोयल यांनी दिल्या आहेत.

Web Title: 100 crore loan for women self help groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.