जेम्बे वाद्याचा ताल, सुरांची रंगतदार मैफल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 00:44 IST2019-04-04T00:44:11+5:302019-04-04T00:44:16+5:30
कोल्हापूर : आर्या आंबेकरची सुरेल गायकी, रोहित राऊतचा रॉकिंग परफॉर्मन्स आणि शिखर नाद कुरेशी यांचा भारतीय व पाश्चिमात्य संगीताचा ...

जेम्बे वाद्याचा ताल, सुरांची रंगतदार मैफल
कोल्हापूर : आर्या आंबेकरची सुरेल गायकी, रोहित राऊतचा रॉकिंग परफॉर्मन्स आणि शिखर नाद कुरेशी यांचा भारतीय व पाश्चिमात्य संगीताचा सुरेख मेळ साधत अंतर्नाद करणारे वादन अशा संगीतमयी सादरीकरणाने मंगळवारी (दि. २) कोल्हापूरकरांची सायंकाळ रंगली. एकीकडे एप्रिलमधील उन्हाचा तडाखा सुरू असताना कलेचा वारसा जपणाऱ्या आणि कलासक्त करवीरकरांना या कलाकारांच्या लाईव्ह कॉन्सर्टने आपल्या रंगारंग गीतसुरांनी चिंब केले.
केशवराव भोसले नाट्यगृहात ‘लोकमत’ आयोजित व सेलो प्रेझेंट्स पॉवर्ड बाय रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्यावतीने ‘सूर ज्योत्स्ना’ या राष्ट्रीय संगीत पुरस्कारावर मोहोर उमटवलेली गायिका आर्या आंबेकर व सिनेगायक रोहित राऊत यांच्या लाइव्ह कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘सूर ज्योत्स्ना’ राष्ट्रीय संगीत पुरस्कार विजेता वादक शिखर नाद कुरेशी याची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात ‘सखी मंच’च्या संस्थापक व संगीत साधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या प्रतिमापूजनाने व ‘सूर ज्योत्स्ना अँथम’ने झाली. यावेळी चकोते ग्रुप आॅफ कंपनीजचे चेअरमन अण्णासाहेब चकोते, पंडित विनोद डिग्रजकर, गार्डियन ग्रुपचे कृष्णा दिवटे, ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले उपस्थित होते.
सुरेल प्रवासाची सुरुवात शिखर नाद कुरेशी यांच्या जेम्बे या पाश्चिमात्य वाद्यवादनाने झाली. भारतीय अभिजात संगीत आणि पाश्चिमात्य संगीताचा मिलाफ करीत जेम्बेवर शिताफीने फिरणाऱ्या त्यांच्या हातांनी लयकारीत विविध दर्जे, छंद सादर केले.
तबल्यासह विविध तालवाद्यांवर हुकूमत, शास्त्रीय संगीताचा ठहराव आणि विविध छंद घेऊन त्यांवर आधारित बोलरचनांचे त्यांनी सादरीकरण केले.
सुरेल स्वर आणि रसिक मनांचा ठाव घेत गायिका आर्या आंबेकरने ‘बोलावा विठ्ठल’ या भक्तिगीताने गायनाची सुरुवात केली ‘आदिमाया अंबाबाई’ गीतातून कोल्हापूरच्या देवीला वंदन केल्यानंतर तिने रसिकांना प्रेमगीतांच्या दुनियेची सफर घडविली. ‘येऊ कशी प्रिया,’ ‘दिवा लावू दे...’ नंतर सादर झालेल्या ‘हृदयात वाजे समथिंग’ या गाजलेल्या गाण्याला टाळ्या, शिट्ट्यांनी अस्सल कोल्हापुरी पद्धतीची दाद मिळाली. ‘तुला पाहते रे’ या टायटल सॉँगला ‘वन्समोअर’ची फर्माईश आली. ‘उगवली शुक्राची चांदणी’ या मराठमोळ्या लावणीनंतर ‘सजन दारी आला काय आता करू’ या स्वरचित गीताने आपल्या गायकीची सांगता केली.
रॉकस्टार रोहित राऊतच्या रॉकिंग परफॉर्मन्सने तर कोल्हापूरकरांना थिरकायला लावले. मन उधाण वाºयाचे, मला वेड लागले प्रेमाचे या गीतांनी मंंत्रमुग्ध करीत त्याने गायनाची सुरुवात केली. अनोख्या पद्धतीने गायलेली ‘आज जाने की जिद ना करो’ ही गाजलेली गझल तर वाहवा मिळवून गेली.
यानंतर रसिकांनाही थिरकायला भाग पाडत जोश आणि अखंड ऊर्जेने त्याने तू जाने ना, कबिरा मान जा, मितवा, दिल से रे, बन्नो चली ससुराल... अशा हिंदी गीतांच्या फ्युजनने गाण्यावरची हुकूमत दाखविली. रांगड्या कोल्हापूरकरांना मराठमोळ्या गीतांच्या दुनियेत नेत त्याने ‘डोकं फिरलंया’, ‘जवा नवीन पोपट हा’ आणि अखेरच्या ‘झिंगाट’ गाण्यावर सभागृहाला थिरकवत त्याने लाईव्ह कॉन्सर्टचा समारोप केला.
अभिजित कुलकर्णी यांनी कोल्हापूरच्या वैशिष्ट्यांची मांडणी करीत बहारदार निवेदन करीत कार्यक्रमात रंगत आणली. वृषाली शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.