ZP Election kolhapur-कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी राहुल पाटील, उपाध्यक्षपदी जयवंतराव शिंपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 19:03 IST2021-07-12T11:18:27+5:302021-07-12T19:03:21+5:30
ZP Election kolhapur: नाट्यमय घडामोडीनंतर कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे राहुल पाटील, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे जयवंतराव शिंपी यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पी. एन. पाटील यांचे राहुल हे चिरंजीव आहेत.

ZP Election kolhapur-कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी राहुल पाटील, उपाध्यक्षपदी जयवंतराव शिंपी
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे राहुल पाटील, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे जयवंतराव शिंपी यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पी. एन. पाटील यांचे राहुल हे चिरंजीव आहेत. काँग्रेस नेत्यांच्या विनंतीवर भाजप नेत्यांनी अर्ज न दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली. जिल्हा परिषदेत दोन्ही काँग्रेससह शिवसेनेची म्हणजेच महाविकास आघाडीची सत्ता आहे.
गेले काही दिवस राष्ट्रवादीचे ज्येष्ठ सदस्य युवराज पाटील अध्यक्ष होणार असल्याची चर्चा होती. परंतु शेवटच्या दोन दिवसांमधील घडामोडीनंतर निर्णय बदलत गेले. जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते, पालकमंत्री सतेज पाटील आणि ज्येष्ठ नेतेे आमदार पी. एन. पाटील यांच्यात या मुद्द्यावरून पुन्हा मतभेद वाढू नयेत यासाठी दिल्ली आणि प्रदेश पातळीवरून आलेल्या सूचना, सतेज पाटील यांची तोंडावर असलेली विधानपरिषद निवडणूक आणि जिल्हा बँक निवडणुकीसाठी मुश्रीफ यांना आवश्यक असलेले पाटील यांचे सहकार्य, या सर्व बाबींचा विचार करून अखेर राहुल पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
आमदार राजेश पाटील यांच्या प्रयत्नातून शिंपी यांनी गेल्या तीन महिन्यात पदाधिकारी निवडीवरून शरद पवार यांची दोन वेळा भेट घेतली होती. परिणामी स्थानिक नेत्यांनीही शिंपी यांना पसंती दिली आणि ज्येष्ठत्वाचा विचार करून त्यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. मंगळवारी चार विषय समिती सदस्यांच्या निवडी होणार असून त्यातील तीन शिवसेनेला, तर एक पद काँग्रेस किंवा अपक्षाकडे जाऊ शकते. या निवडीतही महाविकास आघाडी कोल्हापूर जिल्ह्यात मजबूतपणे काम करत असल्याचे स्पष्ट झाले.