कोल्हापूर : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीबाबत कोणतीही प्रक्रिया पुढील सुनावणीपर्यंत म्हणजे ४ सप्टेंबर २०२५ पर्यंत राबवली जाणार नसल्याचे स्पष्ट म्हणणे सरकारी वकील ॲड. अनिल साखरे यांनी सोमवारी मांडले. करवीर, कागल आणि आजरा तालुक्यातील रचनेबाबत ही एकत्रित सुनावणी घेण्यात आली.कागल तालुक्यातील गावांची अदलाबदल, करवीर तालुक्यातील ग्रामपंचायतीही फोडणारी प्रारूप रचना आणि आजरा तालुक्यातील एक मतदारसंघ रद्द करण्याबाबत एकत्रित सुनावणी सोमवारी घेण्यात आली. त्यावेळी सरकारतर्फे ॲड. साखरे आणि ॲड. नेहा भिडे यांनी काम पाहिले. या तीन तालुक्यांपैकी केवळ करवीर तालुक्याबाबत सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. युवराज नरवणकर यांनी काम पाहिले.युक्तिवाद करताना सरकारी वकिलांनी वेळ मागून घेतला. परंतु, यावेळी ॲड. नरवणकर यांनी या दरम्यान जर निवडणूक प्रक्रिया पुढे गेली तर काय अशी विचारणा केली. यावर न्यायमूर्तींनी विचारणा केल्यानंतर जोपर्यंत ही सुनावणी होत नाही तोपर्यंत जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक प्रक्रिया पुढे जाणार नाही, असे सरकारी वकिलांमार्फत सांगण्यात आले. त्यामुळे आता ४ सप्टेंबरकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
जिल्हा परिषद निवडणूक प्रक्रिया ४ सप्टेंबरपर्यंत राबविणार नाही, सरकारी वकिलांनी मांडले सर्किट बेंचसमोर म्हणणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 18:41 IST