गडहिंग्लजमध्ये सार्वजनिक मैदानाला जिल्हा परिषदेची मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:23 IST2021-01-21T04:23:36+5:302021-01-21T04:23:36+5:30

शिवानंद पाटील गडहिंग्लज : फुटबॉल, अ‍ॅथलेटिक्सच्या प्रतिभावंत खेळाडूंचे आगार असणाऱ्या गडहिंग्लज केंद्रात सुसज्ज मैदानाचा प्रश्न सुटण्याच्या आशा निर्माण झाल्या ...

Zilla Parishad approval for public ground in Gadhinglaj | गडहिंग्लजमध्ये सार्वजनिक मैदानाला जिल्हा परिषदेची मंजुरी

गडहिंग्लजमध्ये सार्वजनिक मैदानाला जिल्हा परिषदेची मंजुरी

शिवानंद पाटील

गडहिंग्लज : फुटबॉल, अ‍ॅथलेटिक्सच्या प्रतिभावंत खेळाडूंचे आगार असणाऱ्या गडहिंग्लज केंद्रात सुसज्ज मैदानाचा प्रश्न सुटण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत. दोन दशकांपासून सार्वजनिक मैदानाचा प्रश्न रेंगाळला होता. एम. आर. हायस्कूलच्या वडरगे मार्गावरील शेतीशाळेच्या पडीक जागेवर सार्वजनिक मैदान साकारण्यास जिल्हा परिषदेच्या सभेत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे खेळाडू आणि क्रीडाप्रेंमीच्या मैदानाच्या मागणीला पालवी फुटली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने या मैदानाच्या उभारणीला गती मिळणार आहे.

दोन दशकांपूर्वी जिल्ह्यात सर्वप्रथम याठिकाणी सार्वजनिक मैदान मंजूर झाले. एक तपाच्या न्यायालयीन लढाईनंतर संकुलाच्या जागेचा ताबा मिळाला. परंतु, आठ वर्षांपासून राजकीय उदासिनता आणि प्रशासकीय दिरंगाईमुळे मैदान फलकावरच आहे.

शहरातील अन्य शाळा व महाविद्यालयांना पुरेसे मैदान नसल्याने तेथील विद्यार्थ्यांना एम. आर. हायस्कूल, शिवराज महाविद्यालयाच्या मैदानाची खेळासाठी मदत घ्यावी लागते. याठिकाणी सकाळ-संध्याकाळी फुटबॉल, क्रिकेट, अ‍ॅथलेटिक्स खेळांडूची झुंबड असते. मात्र, या मैदानाभोवती शैक्षणिक संकुल असल्याने सरावाला व स्पर्धांना मर्यादा येतात. याचा फटका खेळाडू व क्रीडा संघटनाना बसत आहे.

गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनसह क्रिडा, सामाजिक संघटनांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे शिष्टमंडळाद्वारे जिल्हा परिषद सार्वजनिक मैदानाची मागणी केली होती.

मुश्रीफ यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील यांना तातडीने याबाबत कार्यवाही करण्याची सूचना केली होती. वडरगे रोडवरील एम. आर. हायस्कूलची शेती विभागाची जागा अनेक वर्षे वापराविना पडीक असलेली जागा शिष्टमंडळाने सुचविली होती. त्यानुसार उपाध्यक्ष पाटील व गडहिंग्लज तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्यांनी स्थायी समितीत यास मंजुरी घेतली होती. मंगळवार (१९) जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत या मैदानाच्या उभारणीला मंजुरी देण्यात आली.

--------------------------

* स्थानिक क्रिडाक्षेत्राला बळ

गुणवंत फुटबॉल व धावपट्टूंची खाण म्हणून गडहिंग्लजची ओळख आहे. राज्य व राष्ट्रीय स्तरावर येथील खेळाडूंचा दबदबा आहे. त्या तुलनेत क्रिडासुविधा नसल्याने प्रगतीचा आलेख खाली येत आहे. तालुक्यात एकही सुसज्ज मैदान नसल्याने खेळाडूंना छोट्या मैदानावर दुखापतींचा सामना करत सराव करावा लागत आहे. नव्या मैदानाच्या मंजुरीने तालुक्यातील खेळाडूंची मोठी सोय झाली असून क्रिडाक्षेत्राला बळ मिळाले आहे.

Web Title: Zilla Parishad approval for public ground in Gadhinglaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.