योग उत्सवामुळे फुलल्या शाळा

By Admin | Updated: June 22, 2015 00:47 IST2015-06-22T00:40:21+5:302015-06-22T00:47:29+5:30

सुटीचा दिवस : शिक्षक, खासगी संस्थांचा सहभाग : पालकमंत्र्यांनीही गिरवले योगाचे धडे

Yule festival is full of flowers | योग उत्सवामुळे फुलल्या शाळा

योग उत्सवामुळे फुलल्या शाळा

कोल्हापूर : योग ही प्राचीन संस्कृतीने मानवाला दिलेली अमूल्य भेट आहे. शरीर व मनाचे विकार हे योगाभ्यासाने दूर होऊन निरामय जीवनाचा आनंद उपभोगणे केवळ योगामुळेच शक्य आहे. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेपुढे मांडलेल्या संकल्पनेनुसार पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रविवारी, २१ जून हा दिवस जगभर‘योग दिन’ म्हणून साजरा केला. याचाच एक भाग म्हणून कोल्हापुरातही या योगदिनाच्या मोहिमेला पावसातही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या वर्गांत विविध शैक्षणिक संस्था, आरोग्य केंद्रे, एन.सी.सी.चे छात्र, नागरिक शासकीय अधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संघटना, पक्ष आणि अगदी पालकमंत्रीही सहभागी झाले होते.या दिनानिमित्त सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये जणू स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन असल्यासारखीच फुलली. यावेळी ‘नको गोळी, नको औषध; करा योगा, वाजवा टाळी’ असा संदेश दिला. शहरातील अनेक ठिकाणी योगासनांचे तंत्रशुद्ध धडे योगतज्ज्ञांमार्फत दिले गेले. भारतीय जनता पक्ष व
पतंजली योग विद्यापीठ भारतीय जनता पक्ष व पतंजली योग विद्यापीठ यांच्यातर्फे दैवज्ञ बोर्डिंग येथे रविवारी सकाळी सहा वाजून ४५ मिनिटांनी ‘पतंजली’चे महामंत्री व योग प्रशिक्षक शेखर खापणे यांनी उपस्थितांना योगासनांचे तंत्रशुद्ध धडे दिले. वर्गात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीही हे धडे गिरविले. पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश जाधव, अशोक देसाई, विजय जाधव, राहुल चिकोडे, आदींनीही उपस्थिती लावली. येथील पेटाळा मैदान येथे न्यू एज्युकेशन सोसायटीचे न्यू हायस्कूल, पद्माराजे गल्स हायस्कूल, एस. एम. लोहिया हायस्कूल, रा. ना, सामाणी विद्यालय तसेच प्रिन्स शिवाजी मराठा बोडींग हाऊसच्या मैदानात न्यू कॉलेज, एन. सी. सी. कॅडेट, महाराष्ट्र हायस्कूल, गल्स हायस्कूल आदी संस्थेतील हजारो विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले.

३३ मिनिटे ठरली महत्त्वाची
आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त ३३ मिनिटांच्या योग प्रात्यक्षिकांचे नियोजन करण्यात आले होते. यात प्रथम श्लोक, ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, अर्धचक्रासन; तर बैठ्या प्रकारात भद्रासन, सेतुबंध, कपालभाती, प्राणायाम, भ्रामरी, ध्यानमुद्रा, आदी योगासनांची प्रात्यक्षिके सर्वत्र सादर करण्यात आली.


पाचशेंहून अधिक मार्गदर्शक
पतंजली योग विद्यापीठातील पाचशेंहून अधिक योग मार्गदर्शकांनी दैवज्ञ बोर्डिंग, सैनिक दरबार, खराडे हॉल, शिवाजी मंदिर, पतंजली चिकित्सालय, सणगर तालीम, नागोबा देवालय, विश्वपंढरी, मरूधर भवन, जिल्हा परिषद, पोलीस मैदान, महाराष्ट्र नगर, केमिस्ट असोसिएशन, मौनी विद्यापीठ, गारगोटी, चिंचवाड हायस्कूल, चिंचवाड, राम मंदिर, गडहिंग्लज, राधानगर ग्रामपंचायत हॉल, यशवंत मंगल कार्यालय, हुपरी, कळे, मलकापूर, दत्तवाड, शिरोळ, चंदगड, भुदरगड, आजरा, आदी ठिकाणी मार्गदर्शन केले.


पेट्रोल पंपांवरही प्रात्यक्षिके
या योगदिनाची के्रझ पेट्रोल पंपांवरही होती. संभाजीनगर येथील वाघ पेट्रोल पंपावरही कर्मचाऱ्यांसाठी पंपचालकांनी सकाळी ६.४५ ते आठ या कालावधीत योगासनांचे वर्ग भरविले होते. या योगवर्गाची उत्सुकता पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांनाही होती. काही ग्राहक या ठिकाणी स्वत:हून येऊन बसत होते. या दरम्यान एक कर्मचारी येणाऱ्या ग्राहकांना पेट्रोल सोडत होता. या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले.



शिवाजी विद्यापीठात
भर पावसातही प्रतिसाद
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित विशेष योग शिबिराला भर पावसातही सुमारे दीड हजारांहून अधिक विद्यार्थी, नागरिक, आबालवृद्धांसह महिलांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभला. शिवाजी विद्यापीठातील लोककला केंद्रात रविवारी सकाळी योग शिबिराचे उद्घाटन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे व कणेरीच्या श्री सिद्धगिरी मठाचे मठाधिपती मुप्पीन काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या हस्ते रोपट्यास पाणी घालून करण्यात आले.
राष्ट्रीय सेवा योजना, श्री सिद्धगिरी मठ, कणेरी व योग विद्याधाम, कोल्हापूर यांच्यातर्फे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कुलगुरू डॉ. शिंदे यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या आयोजनाची पार्श्वभूमी सांगितली. योगशिक्षक दत्ता पाटील व स्वरूप जाधव यांनी सुमारे दीड तास उपस्थितांना विविध योगप्रकारांची शास्त्रशुद्ध प्रात्यक्षिके दाखवून ती उपस्थितांकडून करवून घेतली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कुलगुरू डॉ. शिंदे व काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या हस्ते ‘योग संदेश’ या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. क्रीडा अधिविभागप्रमुख पी. टी. गायकवाड यांनी स्वागत व विद्यार्र्थी कल्याण संचालक डॉ. डी. के. गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. योग विद्याधामचे विजय शेटे यांनी योगविषयक मार्गदर्शन केले. एस. एन. लांबोरे यांनी सूत्रसंचालन केले. या शिबिरास प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांच्यासह योग विद्याधामचे अध्यक्ष दत्तात्रय भिऊंगडे, उपाध्यक्ष डॉ. डी. व्ही. मुळे, नित्यानंद स्वामी, भैया घोरपडे, माणिक पाटील-चुयेकर, डॉ. संदीप पाटील, शेखर आजरी, अमित हुक्केरीकर, अ‍ॅड. एम. डी. पाटील, विक्रम पाटील, महेश मास्तोळी, नामदेव बामणे, अक्षय दोशी उपस्थित होते.
या शिबिरात विद्यापीठातील अधिविभागप्रमुख, शिक्षक, अधिकारी, प्रशासकीय सेवक, संशोधक, विद्यार्र्थी यांच्यासह अंबुताई विद्यालय, गोकुळ शिरगाव, कणेरी हायस्कूल, कणेरी येथील विद्यार्र्थी, विद्यार्थिनींसह विविध वयोगटांतील नागरिक सहभागी झाले होते.


५मोफत योग शिबिर
प्रत्येक योग प्रकाराचे मानवी शरीर व मनस्वास्थ्याच्या दृष्टीने किती महत्त्व आहे, याची सविस्तर व मोफत माहिती शिवाजी विद्यापीठातील लोककला केंद्रात २७ जूनपर्यंत योग शिबिरातून देण्यात येणार आहे. तरी सकाळी ७ ते ८.३० या वेळेत हे शिबिर सुरू राहणार असून, इच्छुकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Yule festival is full of flowers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.