तरुणांनी वाहतुकीचे नियम पाळावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:10 IST2021-02-05T07:10:21+5:302021-02-05T07:10:21+5:30
कोल्हापूर : महाविद्यालयीन तरुण हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना त्यांना शासकीय सेवेत येण्यासाठी पोलीस रेकॉर्ड स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. ...

तरुणांनी वाहतुकीचे नियम पाळावेत
कोल्हापूर : महाविद्यालयीन तरुण हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना त्यांना शासकीय सेवेत येण्यासाठी पोलीस रेकॉर्ड स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी तरुणांनी वाहतुकीचे नियम पाळल्यास अपघातासारखा प्रकार होणार नाही, असे प्रतिपादन जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाचे सचिव पंकज देशपांडे यांनी केले.
विधिसेवा प्राधिकरण व शहर वाहतूक नियंत्रण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गोपाळ कृष्ण गोखले महाविद्यालयात गुरुवारी ३२वा रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रम झाला, त्याप्रसंगी देशपांडे बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वृषाली जोशी होत्या.
शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी म्हणाल्या, रस्ते अपघात टाळण्यासाठी प्रत्येक वाहनधारकाने नियमांचे पालन करावे लागेल. वाहन चालवताना घाई, गडबड केली, चुकीच्या मार्गाने वाहन चालवल्यास हमखास अपघात घडतात. त्यामुळे नियमांचे पालन करत वाहन चालविणे गरजेचे आहे. गोखले महाविद्यालयाचे प्राचार्य पी.के. पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचालन प्रमोद झावरे यांनी केले. प्राधिकरणाचे कर्मचारी राजीव माने, स्वयंसेवक फ्रान्सिस्का डिसोझा, लक्ष्मीकांत जोशी, अनिकेत मोहिते, बाळासाहेब खुपेकरकर यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी, कर्मचारी, एनसीसीचे विद्यार्थी उपस्थित होते.