कार उलटल्याने मिरजेचा तरुण ठार
By Admin | Updated: June 30, 2014 00:51 IST2014-06-30T00:50:06+5:302014-06-30T00:51:44+5:30
सांगली-कोल्हापूर महामार्गावरील घटना

कार उलटल्याने मिरजेचा तरुण ठार
जयसिंगपूर : चालकाचा ताबा सुटल्याने स्वीफ्ट डिझायर ही कार उलटून झालेल्या अपघातात मिरजेचा तरुण ठार झाला. महेश दत्तात्रय वांडरे (वय २९, रा. पंढरपूर रोड, चौगुले हॉस्पिटलच्या मागे, मिरज) असे त्याचे नाव असून, या घटनेची नोंद सांगली येथील विश्रामबाग पोलीस ठाण्यात झाली आहे. शनिवारी (दि. २८) रात्री साडेबाराच्या सुमारास सांगली-कोल्हापूर महामार्गावरील हॉटेल सप्तगिरी समोर हा अपघात झाला.
पत्नी व मुलाला कोल्हापूर येथे सोडण्यासाठी महेश वांडरे हे स्वीफ्ट डिझायर (एम.एच. १२ सीवाय ६५००) या चारचाकी वाहनातून गेले होते. रात्री मिरजेकडे परतत असताना वाहनाचे पुढील चाक पंक्चर झाल्याने महेश यांचा गाडीवरील ताबा सुटला. गाडी इंगळे मळ्याजवळील रस्त्याच्या बाजूला जाऊन दहा फूट खड्ड्यात पलटी झाली. यामध्ये महेश गंभीर जखमी झाल्याने जयसिंगपूर पोलिसांनी सांगलीच्या सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
महेश शेती करीत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. अधिक तपास हवालदार आनंदा चौगुले करीत आहेत. (प्रतिनिधी)