कोल्हापूर : कळंबा येथील टर्फवर फुटबॉल खेळताना अत्यवस्थ झालेला महेश धर्मराज कांबळे (वय ३०, रा. निर्माण चौक, संभाजीनगर) याचा घरी पोहोचल्यानंतर हृदयविकाराने मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. १५) दुपारी एकच्या सुमारास घडली. सुटी असल्याने तो मित्रांसोबत फुटबॉल खेळण्यासाठी गेला होता.महेश कांबळे हा एका खासगी बँकेच्या वसुली प्रतिनिधी पदावर काम करीत होता. पत्नी आणि पाच वर्षांच्या मुलीसह तो निर्माण चौक येथे राहत होता. रविवारी सुटी असल्याने तो मित्रांसोबत कळंबा येथील टर्फवर फुटबॉल खेळण्यासाठी गेला. खेळताना त्याला अस्वस्थ वाटू लागले. काहीवेळ त्याने विश्रांती घेतली. त्यानंतर रिंग रोडवरील एका खासगी हॉस्पिटलमध्ये तो उपचारासाठी गेला. उपचार घेऊन घरी पोहोचल्यानंतर काही वेळात चक्कर येऊन तो कोसळला. मित्रांनी त्याला तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले. त्यानंतर खासगी रुग्णालयात हलवले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
फुटबॉल खेळताना तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू, कोल्हापुरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 12:34 IST