मोबाईल बरादेत नोड यारद.. आयपीएस आगिदी मत बरवला; बिरदेव डोणे यांचा सत्कारावेळचा संवाद
By भीमगोंड देसाई | Updated: April 25, 2025 12:37 IST2025-04-25T12:36:14+5:302025-04-25T12:37:38+5:30
मोबाईल सातत्याने खणखणत राहिला, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी दिवसभर त्याचा पाठलाग करून साधत होते संवाद

मोबाईल बरादेत नोड यारद.. आयपीएस आगिदी मत बरवला; बिरदेव डोणे यांचा सत्कारावेळचा संवाद
भीमगोंडा देसाई
कोल्हापूर : कागल तालुक्यातील यमगे या अतिशय छोट्या गावच्या बिरदेव सिद्धपा डोणे यांचा युपीएससीतील यशानंतर बुधवारी कर्नाटकातील शेतात मेंढराच्या कळपातील तळावर सत्कार झाला. त्यावेळी त्याला फेटा बांधताना मोबाईल सातत्याने वाजत होता. त्याला कन्नड भाषाही येत असल्याने तो कन्नडमध्ये मोबाईल ‘यारद बरादेत नोड,’ असे मित्राला म्हणाला. त्यावर ‘इग आयपीएस आगिदी मत फोन बरवला,’ असे उत्तर देताच, शेजारी असलेले त्याचे वडील आणि नातेवाईकांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.
बिरदेव मेंढपाळ कुटुंबातला. कर्नाटक सीमेलगत त्याचे गाव. त्याचे बहुतांशी नातेवाईक बेळगाव जिल्ह्यात असल्याने त्याला कन्नड भाषाही चांगली येते. कुटुंबातही त्याचा कन्नडमध्ये संवाद असतो. मराठीतून शिक्षण, घरी उच्चशिक्षणाची पार्श्वभूमी नाही, प्रतिकूल परिस्थती तरी तो आयपीएस झाला. त्याने देशात ५५१ वी रँक मिळविली आहे.
निकाल समोर आला त्यावेळी बिरदेव आपल्या आई, वडील यांच्यासह बेळगाव परिसरात बकरी चारण्यात व्यस्त होता. तिथेच त्याला निकाल कळाला. त्यानंतर समाजातील ज्येष्ठ, जवळचे नातेवाईक त्याचा सत्कार करण्यासाठी तो असलेल्या ठिकाणी मेंढरांच्या कळपात पोहोचली. सत्कार करण्यापूर्वी फेटा बांधताना मोबाईल दुसऱ्याकडे दिला. तो मोबाईल सातत्याने खणखणत राहिला.
त्यावेळी बिरू कन्नडमध्ये माझ्या माेबाईलवर कोण संपर्क करत आहे बघ.. असे म्हणतो. त्यावेळी मोबाईल घेतलेल्या त्याचे नातेवाईक आता तू आयपीएस झाला आहेत, मोबाईल येणारच की असे उत्तर देताच आजूबाजूला मेंढराच्या कोकरू घेऊन थांबलेली लहान मुलेही कुतूहलाने पाहत राहतात. आई, वडिलांमध्ये मुलगा मोठा साहेब झाल्याची भावना निर्माण होते.
बहिणीला भेटण्यासाठी जोडकुळ्ळीत गेला..
बिरदेव काल गुरुवारी चिक्कोडी तालुक्यातील जोडकुळ्ळी येथे बहिणीला भेटण्यासाठी गेला होता. दिवसभरही त्याचा मोबाईल सातत्याने खणखणत राहिला. मराठी, इंग्रजी, हिंदी माध्यमे तो ज्या ठिकाणी असेल तिथे जावून त्याची मुलाखत घेतली. कर्नाटक, महाराष्ट्रातील मुद्रित, इलेक्ट्रॉनिक, समाजमाध्यमे दिवसभर त्याचा पाठलाग करून त्याच्याशी थेट संवाद साधत राहिली.