यंदाची बिले आठवडाभरात देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:24 IST2021-03-31T04:24:30+5:302021-03-31T04:24:30+5:30
वारणानगर...वारणा साखर कारखाना हा उसाच्या रसापासून इथेनॉल उत्पादन करणारा पहिला कारखाना असून, येत्या गळीत हंगामात इथेनॉलचे विक्रमी उत्पादन करण्याचे ...

यंदाची बिले आठवडाभरात देणार
वारणानगर...वारणा साखर कारखाना हा उसाच्या रसापासून इथेनॉल उत्पादन करणारा पहिला कारखाना असून, येत्या गळीत हंगामात इथेनॉलचे विक्रमी उत्पादन करण्याचे उद्दिष्ट वारणेने ठेवले आहे. चालू गळीत हंगामातील राहिलेली सर्व ऊसबिले, ऊसतोडणी वाहतूक
बिले येत्या आठवडाभरात देणार असल्याची माहिती वारणा समूहाचे प्रमुख आमदार डॉ. विनय कोरे यांनी सभेत बोलताना दिली.
येथील तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्याची ६४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी वारणा शिक्षण संकुलातील सभागृहात ऑनलाईन पध्दतीने पार पडली. अध्यक्षस्थानी कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील होते.
कोरे म्हणाले, गेल्या सहा-सात वर्षांत वारणा कारखान्यावर अनेक आर्थिक अरिष्टे आली. साखर निर्यातीची अडकलेली रक्कम, केलेली भांडवली गुंतवणूक, केंद्र व राज्य शासनाची विविध कर्जे, त्यांचे व्याज अशा आव्हानांना कारखान्याला तोंड द्यावे लागले. या काळात एफआरपीपेक्षा जादा दर ऊस उत्पादकांना देण्याची परंपरा राखली आहे. अडचणीच्या काळात सभासद व कर्मचाऱ्यांनी ‘कारखाना माझा-मी कारखान्याचा’ ही भूमिका ठेवून काम केल्यामुळे यावर्षी कारखान्याने सुमारे साडेनऊ लाख टन गाळपाचा टप्पा पूर्ण केला आहे. संपलेल्या गळीत हंगामातील ऊस बिले आर्थिक वर्षअखेरीमुळे लांबणीवर पडली आहेत; मात्र येत्या आठवडाभरात ही उर्वरित सर्व बिले देणार आहे.
४४ मेगावॅट व सुमारे ३२० कोटी रुपयांचा असणाऱ्या ऊर्जांकुर प्रकल्पाचे कर्ज आता ४० कोटी रुपयांचे शिल्लक असून, लवकरच हा प्रकल्प वारणा कारखान्याच्या मालकीचा होणार आहे. पुढील वर्षी इथेनॉलचे विक्रमी उत्पादन करणार असल्याचे आ. कोरे यांनी सांगून, गेल्या सात वर्षांत गाळपास आलेल्या उसास एफआरपीपेक्षा सुमारे ४११ कोटी रुपये जादा दिल्याचे सांगितले.
कारखान्याचे कार्यकारी संचालक एस. आर. भगत यांनी नोटीस वाचन केले; तर सचिव बी. बी. दोशिंगे यांनी दिवंगतांच्या श्रध्दांजलीचा ठराव मांडला. सभेपुढील सर्व विषय सभासदांनी मंजूर केले. उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, दूध संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव उपस्थित होते.
संचालक सुभाष पाटील (नागाव) यांनी आभार मानले. प्रा. नामदेव चोपडे यांनी सूत्रसंचालन केले.
............................................
वारणा कार्यक्षेत्रात ७० गावांत ऑनलाईन सभेचे सेंटर
कोल्हापूर व सांगली कार्यक्षेत्र असणाऱ्या जवळपास ७० हून अधिक गावांत सेंटरची व्यवस्था करण्यात आली होती. त्या-त्या ठिकाणी सभासदांनी शासनाच्या सर्व नियमांचे पालन करत हजेरी राहून ऑनलाईन सभेत सहभाग नोंदविला.
३० वारणा
फोटो ओळी..
तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्याच्या ६४ व्या वार्षिक ऑनलाईन सर्वसाधारण सभेत आमदार डॉ. विनय कोरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, कार्यकारी संचालक एस. आर. भगत,
ज्येष्ठ संचालक रावसाहेब पाटील, गोविंदराव जाधव, सुभाष पाटील, श्रीनिवास डोईजड, दूध संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव व कारखान्याचे सर्व संचालक उपस्थित होते.