यवलूज परिसरात वळीवाची हुलकावणी, शेतीची कामे रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:24 IST2021-05-07T04:24:59+5:302021-05-07T04:24:59+5:30
शब्बीर मुल्ला यवलूज : यवलूजसह पश्चिम भागात वळीवाच्या पावसाने हुलकावणी दिल्याने शेतीच्या मशागतीची कामे रेंगाळली आहेत. यावर्षी पुरेसा वळीव ...

यवलूज परिसरात वळीवाची हुलकावणी, शेतीची कामे रखडली
शब्बीर मुल्ला
यवलूज : यवलूजसह पश्चिम भागात वळीवाच्या पावसाने हुलकावणी दिल्याने शेतीच्या मशागतीची कामे रेंगाळली आहेत. यावर्षी पुरेसा वळीव झाला नसल्याने आभाळाकडे डोळे लावून बसण्याची वेळ आलेल्या या परिसरातील बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली आहे.
यंदा वातावरणातील कमालीच्या उष्म्याने जमिनीची दाहकता वाढली आहे. चैत्र, वैशाख महिन्यात हमखास पडणाऱ्या वळीव पावसाने मात्र यावेळी परिसराला हुलकावणी दिली आहे. रखरखत्या उन्हामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांना त्याची झळ बसली आहे. त्यामुळे साहजिकच शेतातील उभ्या पिकांसाठी त्यांना पाण्याच्या फेऱ्या वाढवाव्या लागत आहेत. अशातच गेळवडे जलाशयातील पाणीपातळीत घट जाणवू लागल्याने पाटबंधारे विभागाकडून काही दिवसांकरिता कासारी धरणक्षेत्रासाठी शेतीच्या पाण्यासाठी उपसाबंदीही करण्यात आलेली होती.
यवलूज, पङळ, माजगाव, सातार्डे, शिंदेवाडी, खोतवाडी यासह पश्चिम भागात अनेक गावात वळीवाच्या दररोजच्या हुलकावणीने बळीराजाला मान्सूनच्या आगमनाची वाट पहावी लागते की काय अशी धास्ती वाटू लागली आहे. यावर्षी मान्सून वेळेत दाखल होणार असल्याचे हवामान खात्याद्वारे सांगण्यात येत असले तरी तत्पूर्वी शेतीच्या मशागतीच्या कामांसाठी नेहमीच असणारी वळीवाची कृपादृष्टी ही शेतकऱ्यांसाठी मान्सूनपूर्वी अत्यंत महत्त्वाची असते. या भागातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या मशागतीअभावी भात पिकांसह त्यांच्या इतर पावसाळी पिकांच्या पेरणीची कामे लांबणीवर पडण्याच्या धोका निर्माण झाला. सद्यस्थितीला वळीवाअभावी या भागातील बळीराजाचा जीव टांगणीला लागला आहे.