जैन्याळच्या यशवंत बांबरे याचे चांद्रयान मोहिमेत योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 11:25 AM2019-07-24T11:25:20+5:302019-07-24T11:28:13+5:30

गावातील दूध संस्थेत (डेअरी) मापाडी, पतसंस्थेमध्ये पिग्मी एजंट म्हणून काम करत शिक्षण पूर्ण करून ‘इस्त्रो’मध्ये शास्त्रज्ञ अभियंता म्हणून रुजू झालेल्या जैन्याळ (ता. कागल) येथील यशवंत सखाराम बांबरे या २७ वर्षीय युवकाने जगाचे लक्ष लागून राहिलेल्या चांद्रयान-२ या मोहिमेत योगदान दिले आहे. या मोहिमेतील संशोधन प्रक्षेपण टीममध्ये त्याचा समावेश होता. त्याच्या माध्यमातून कोल्हापूरचा सन्मान झाला आहे.

Yashwant Bambre of Zainal contributed to the Chandrayaan campaign | जैन्याळच्या यशवंत बांबरे याचे चांद्रयान मोहिमेत योगदान

जगभराचे लक्ष लागून राहिलेल्या चांद्रयान-२ मोहिमेच्या यशानंतर ‘इस्त्रो’तील आपल्या अन्य सहकाऱ्यांसमवेत जैन्याळ (ता. कागल) येथील यशवंत बांबरे याने जल्लोष करत आनंद व्यक्त केला.

Next
ठळक मुद्देजैन्याळच्या यशवंत बांबरे याचे चांद्रयान मोहिमेत योगदानइस्त्रोमध्ये तीन वर्षांपासून कार्यरत; कोल्हापूरचा सन्मान

सेनापती कापशी/कोल्हापूर : गावातील दूध संस्थेत (डेअरी) मापाडी, पतसंस्थेमध्ये पिग्मी एजंट म्हणून काम करत शिक्षण पूर्ण करून ‘इस्त्रो’मध्ये शास्त्रज्ञ अभियंता म्हणून रुजू झालेल्या जैन्याळ (ता. कागल) येथील यशवंत सखाराम बांबरे या २७ वर्षीय युवकाने जगाचे लक्ष लागून राहिलेल्या चांद्रयान-२ या मोहिमेत योगदान दिले आहे. या मोहिमेतील संशोधन प्रक्षेपण टीममध्ये त्याचा समावेश होता. त्याच्या माध्यमातून कोल्हापूरचा सन्मान झाला आहे.

श्रीहरीकोटा येथून भारताने यशस्वीपणे भरारी केलेल्या चांद्रयान-२ ही इस्त्रोची महत्त्वाकांक्षी योजना सत्यात उतरविण्यासाठी जे अनेक संशोधक परिश्रम घेत होते. त्यातील संशोधन प्रक्षेपणाची जबाबदारी त्रिवेंद्रम येथील विक्रम साराभाई स्पेस सेंटरकडे होती. या सेंटरच्या टीममध्ये यशवंत याचा समावेश होता.

जीएसएलव्ही मार्क ३ या प्रक्षेपकाच्या प्रणालीची जबाबदारी या टीमने सांभाळली. चांद्रयान-२ मोहिमेसाठी गेल्या चार महिन्यांपासून यशवंत हा श्रीहरीकोटा येथील इस्त्रोच्या अंतराळ संशोधन केंद्रात कार्यरत होता. यापूर्वी जून २०१७ आणि नोव्हेंबर २०१८ मध्ये झालेल्या मोहिमेतदेखील यशवंत सहभागी झाला होता.

लहानपणीच आईचे छत्र हरपले, वडिलांनी गावात रोजंदारीवर काम करून कष्टाने यशवंत आणि त्याचे भाऊ गुरुदास यांचे पालनपोषण केले. शिक्षणासाठी हमीदवाडा येथील मामाने मदत केली. आर्थिक चणचण व गरिबीची जाणीव असल्याने पिग्मी एजंट, दूध संस्थेत मापाडी म्हणून काम करत शिक्षण पूर्ण केले.

यशवंत याने प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत, तर माध्यमिक शिक्षण सेनापती कापशी येथील न्यायमूर्ती रानडे विद्यालयात पूर्ण केले. बारावी देवचंद महाविद्यालयात पूर्ण करत असताना अनेक अडचणी आल्या. मेणबत्तीच्या उजेडात देवचंद महाविद्यालयातील व्हरांड्यातील काळ्या फरशीलाच पाटी मानली.

विज्ञानाची सूत्रे पाठ केली. त्यानंतर घरची प्रचंड गरिबी असताना पडेल ते काम करत जिद्दीने पुणे येथे बी. ई. मेकॅनिकल पूर्ण केले. वृत्तपत्रातील जाहिरात वाचून ‘इस्त्रो’च्या स्पर्धा परीक्षा त्याने दिली. दिल्लीला परीक्षेला जाण्याकरिता आर्थिक चणचण भासत होती, तरीही त्यावर मात करून तो दिल्लीत पोहोचला. त्यावेळी संपूर्ण भारतातून ज्या ११ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यात महाराष्ट्रातून केवळ दोघे निवडले गेले. त्यामध्ये यशवंतचा समावेश होता.

इस्त्रोमध्ये दि. १३ मे २०१६ रोजी तो दाखल झाला. गेल्या तीन वर्षांपासून येथे शास्त्रज्ञ अभियंता म्हणून काम करत आहे. परिस्थितीशी संघर्ष करत जिद्द आणि मेहनत घेतली, तर यशस्वी इतिहास रचता येतो, याचे मूर्तिमंत उदाहरण यशवंत हे आहे.

 


विक्रमसाराभाई स्पेस सेंटरमध्ये शास्त्रज्ञ अभियंता म्हणून मी कार्यरत आहे. चांद्रयान-२ चे प्रक्षेपण आणि त्या ठिकाणी आलेला अनुभव मी आयुष्यात विसरू शकणार नाही; त्यामुळे हा क्षण माझ्या आयुष्यात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. ‘चांद्रयान’च्या यशस्वी भरारीने प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने फुलली आहे. संपूर्ण जगाला भारताने आपली अवकाश संशोधन क्षेत्रातील ताकद दाखविली आहे.
- यशवंत बांबरे

 

 

Web Title: Yashwant Bambre of Zainal contributed to the Chandrayaan campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.