‘वाई फेस्टिव्हल’ उद्यापासून
By Admin | Updated: December 12, 2014 23:43 IST2014-12-12T22:29:54+5:302014-12-12T23:43:00+5:30
‘लोकमत’ माध्यम प्रायोजक : रोटरी क्लब, उत्कर्ष पतसंस्थेचा संयुक्त उपक्रम

‘वाई फेस्टिव्हल’ उद्यापासून
वाई : ललित कलांचा आविष्कार, संगीताबरोबरच हास्यकल्लोळ, विविध स्पर्धांमधून गुणदर्शन, क्रीडानैपुण्य आणि सामाजिकदृष्ट्या उपयुक्त उपक्रमांनी परिपूर्ण अशा ‘वाई फेस्टिव्हल’चा प्रारंभ रविवारपासून (दि. १४) होत आहे. रोटरी क्लब आणि उत्कर्ष पतसंस्थेतर्फे संयुक्तपणे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, ‘लोकमत’ माध्यम प्रायोजक आहे.
या महोत्सवांतर्गत शुक्रवारी (दि. १९) सकाळी साडेसात वाजता महागणपती घाटावरून सायकल रॅलीस प्रारंभ होणार असून, शहीद जवानांना अभिवादन म्हणून ही रॅली होणार आहे. शनिवारी (दि. २०) सकाळी दहा वाजल्यापासून गोविंद रामेश्वर मंगल कार्यालयात महिला बचत गटांचे स्टॉल विक्रीसाठी खुले होणार असून, वाईकरांना अनेक उपयुक्त वस्तू वाजवी दरात येथे उपलब्ध होणार आहेत. त्याच दिवशी सायंकाळी साडेसहा वाजता ‘देश मेरा रंगीला’ या नृत्याच्या आणि संगीताच्या कार्यक्रमाद्वारे फेस्टिव्हलचे औपचारिक उद््घाटन होणार आहे.
रविवारी (दि. २१) सकाळी दहा वाजता काशीविश्वेश्वर मंदिर येथे रक्तदान शिबिर होणार असून, तेथेच अकरा वाजता रांगोळी स्पर्धा होणार आहेत. सायंकाळी साडेसहा ते साडेआठ या वेळेत महागणपती घाटावर दिलीप हल्याळ आणि मृदुला मोघे यांचा ‘हास्य षट्कार’ कार्यक्रम होणार असून, रात्री साडेआठ ते साडेबारा या वेळात एकेरी नृत्य स्पर्धा होणार आहेत. खुल्या गटात होणाऱ्या या स्पर्धेसाठी प्रवेश मर्यादित आहेत.
सोमवारी (दि. २२) सायंकाळी साडेसहा वाजता महागणपती घाटावर समूहनृत्य स्पर्धा होणार आहेत. मंगळवारी (दि. २३) सायंकाळी सात वाजता महागणपती घाटावर ‘उत्कर्ष श्री’ या शरीर सौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. स्पर्धांसाठी उत्कर्ष पतसंस्थेच्या गणपती आळी येथील कार्यालयात नावनोंदणी करायची आहे. वाईकरांनी हजारोंच्या संख्येने या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन वाई फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुनील शिंदे, निमंत्रक आनंद कोल्हापुरे, सचिव मदनकुमार साळवेकर, रोटरी क्लब वाईच्या अध्यक्षा सोनाली शिंदे, सचिव डॉ. नितीन कदम यांनी केले आहे. (प्रतिनिधी)