कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या तिसऱ्या माळेला बुधवारी कोल्हापुरातील श्री करवीर निवासिनी अंबाबाईची श्री तारा माता रूपात पूजा बांधण्यात आली. बुधवारी दुपारच्या आरती नंतर देवीची ही सालंकृत रूपात पूजा बांधण्यात आली. श्रीतारा मातेचा डावा पाय शवावर असून, ही भयानक हास्य करीत आहे. हिच्या चार हातात खड्ग, नीलकमळ, कात्री व खप्पर असून, हिचा जटालाप पिंगट छटेचा असून तो नागयुगुलांनी युक्त आहे. मुंडमाला धारण करणारी, सर्व जडत्व, नैराश्य, दारिद्र्य खप्परात खेचणारी ही दिव्य देवता आहे. ही दशमहाविद्यालयातील द्वितीय देवता असून, कालीकुलातील पूर्वाम्नायपीठ देवता आहे. चैत्रशुद्ध नवमीला हिची उत्त्पती झाली. हिचा भैरव अक्षोभ्यरुद्र आहे. मेरूपर्वताच्या पश्चिमेस चोलना नदीकाठी ही प्रगट झाली. वसिष्ठांनी हिची विशेष उपासना सिद्धी केली. स्पर्शतारा, चिंतामणीतारा, सिद्धिजटा, उग्रतारा, हंसतारा, निर्वाणतारा, महानीला इ. अनेक हिची रूपे व उपासना भेद आहेत. हिच्या उपासनेने सर्वज्ञत्व, संसृतिनाश, मोक्षलाभ, सर्वासिद्धीप्राप्ती, शत्रूनाश, सकल भोग-सुख प्राप्ती होते. ही पूजा रामप्रसाद ठाणेकर, सचिन ठाणेकर, सुहास जोशी, अमित देशपांडे, निखिल शानभाग यांनी बांधली.
Navratri 2025: तिसऱ्या माळेला कोल्हापुरातील अंबाबाई प्रकटली तारा माता रूपात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 15:48 IST