समीर देशपांडेकोल्हापूर : गेल्या महिन्यात कोल्हापूरमध्ये सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील ५०० आरोग्य अधिकाऱ्यांची विभागीय एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत मिळालेल्या ‘डोस’नंतर चारही जिल्ह्यांतील दैनंदिन कामकाजात सुधारणा हाेत आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी राज्यभर या विभागीय कार्यशाळा घेण्याचा निर्णय घेतला आहे.२९ सप्टेंबरला कोल्हापूरला घेतलेल्या कार्यशाळेत उपसंचालक दिलीप माने यांनी चारही जिल्ह्यांचे रोखठोक सादरीकरण केले. अगदी कुठल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील फ्रिजमध्ये घरातील भाजी ठेवली होती इथंपासून कोणत्या केंद्रातील प्रसूतीचे किट तीन महिने उघडलेही नव्हते, अगदी छायाचित्रांसह हे सादरीकरण करून संबंधित केंद्राच्या डॉक्टरांना याबद्दल जागेवरच जाब विचारल्यानंतर आता या चारही जिल्ह्यांत डॉक्टर कामाला लागल्याचे दिसून येत आहे.ज्या अस्वच्छ आरोग्य केंद्रांचे फोटो या कार्यशाळेत दाखवण्यात आले, त्या डॉक्टरांनी परत गेल्यावर आठवडाभरात स्वच्छता मोहीम राबवली आणि चांगल्या स्थितीतील फोटो उपसंचालकांना पाठवले. ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये शून्य प्रसूती झाली अशांना जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी नोटिसा काढल्या असून, त्यादृष्टीनेही नियोजन सुरू झाले आहे.
तीन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना नोटिसाया कार्यशाळेनंतर सांगली, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना नोटिसा काढण्यात आल्या होत्या. त्यामुळे या तिघांनीही दुप्पट वेगाने काम सुरू केल्याचे सांगण्यात येते. याच पद्धतीने राज्यभर वातावरण निर्मिती करण्याचा आरोग्य विभागाचा प्रयत्न आहे.
फोंडा आरोग्य केंद्रासाठी निधीया कार्यशाळेचे सविस्तर वृत्त केवळ ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले. त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सादरीकरणाचा उल्लेख होता. याची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर हे दुसऱ्याच दिवशी या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गेले. तिथली परिस्थिती पाहिली. या जुन्या झालेल्या केंद्रासाठी जिल्हा परिषदेतून निधीही देण्याची तयारी दर्शवली. खेबुडकर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील प्रसूती वाढविण्यासाठीही स्वतंत्र नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. या पद्धतीने चारही जिल्ह्यांत प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ग्रामीण रुग्णालयातील कारभारात सुधारणा होत असल्याने ही कार्यशाळा राज्यातील उर्वरित आठ विभागांमध्येही होणार आहे.
कोल्हापूरच्या कार्यशाळेत आम्ही वस्तुस्थितीदर्शक सादरीकरण केले. यामध्ये कोणालाही पाठीशी घातले नाही. त्यामुळे नेमकी परिस्थिती समजली. त्यावरच्या उपाययोजनाही तातडीने सुरू केल्या असून, त्याला चांगले यश येत आहे. त्यामुळेच राज्यभर या कार्यशाळा घेण्याचा निर्णय सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी घेतला आहे. - दिलीप माने, उपसंचालक, विभागीय आरोग्य मंडळ कोल्हापूर
Web Summary : A workshop in Kolhapur led to improved healthcare services across four districts. Following its success, the Health Minister decided to implement similar workshops statewide, adopting the 'Kolhapur Pattern' for enhanced efficiency.
Web Summary : कोल्हापुर में एक कार्यशाला से चार जिलों में स्वास्थ्य सेवाओं में सुधार हुआ। इसकी सफलता के बाद, स्वास्थ्य मंत्री ने दक्षता बढ़ाने के लिए पूरे राज्य में इसी तरह की कार्यशालाएँ लागू करने का निर्णय लिया।