इचलकरंजीत यंत्रमाग कामगारांची निदर्शने

By Admin | Updated: July 25, 2015 01:14 IST2015-07-25T01:14:34+5:302015-07-25T01:14:34+5:30

सुधारित वेतन प्रश्न : कृती समितीचा सहायक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा

Workers of Ichalkaranji Luminous Workers | इचलकरंजीत यंत्रमाग कामगारांची निदर्शने

इचलकरंजीत यंत्रमाग कामगारांची निदर्शने

इचलकरंजी : यंत्रमाग कामगारांच्या सुधारित वेतनाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी यंत्रमाग कामगार संघटनांच्या कृती समितीने शुक्रवारी येथील सहायक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून जोरदार निदर्शने केली. मोर्चाची पूर्वसूचना देऊनही सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव कार्यालयात उपस्थित राहिले नाहीत म्हणून काही वेळ रास्ता रोकोही करण्यात आला.
यंत्रमाग उद्योगातील कामगारांसाठी सन १९८५ पासून शासनाने किमान वेतनाची फेररचना केलेली नाही. म्हणून येथील लाल बावटा सायझिंग-वार्पिंग कामगार संघटनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
या याचिकेच्या सुनावणीवेळी सरकारने २९ जानेवारी २०१५ रोजी सुधारित किमान वेतन जाहीर केल्याचे सांगितले. त्या सुधारित किमान वेतनाच्या अंमलबजावणीसाठी कामगार संघटना वारंवार आंदोलने करीत आहेत. मात्र, सरकारच्यावतीने त्याची दखल घेतली जात नाही. म्हणून शुक्रवारी येथील यंत्रमाग कामगार संघटनांच्या कृती समितीने मोर्चा काढला आणि सहायक कामगार आयुक्त कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली.
मोर्चाची पूर्वसूचना देऊनसुद्धा सहायक कामगार आयुक्त गुरव हे कार्यालयात उपस्थित नव्हते. त्यामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी काही वेळ रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करीत सहायक कामगार आयुक्त गुरव कार्यालयात येत असल्याचा निरोप दिल्याने आंदोलन संपविण्यात आले. कृती समितीच्यावतीने गुरव यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मोर्चासमोर कामगार नेते दत्ता माने, शामराव कुलकर्णी, भरमा कांबळे, परशराम आगम, आदींची भाषणे झाली. येथून पुढील काळात लढा तीव्र करण्याचे घोषित करून मोर्चा संपविण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: Workers of Ichalkaranji Luminous Workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.