कामगारांंना अनुदान मिळेना
By Admin | Updated: July 20, 2014 00:09 IST2014-07-19T23:55:34+5:302014-07-20T00:09:05+5:30
जुन्या नोंदणीधारक बांधकाम कामगारांत असंतोष : आयुक्त कार्यालयासमोर पावसात रांग

कामगारांंना अनुदान मिळेना
कोल्हापूर : दोन वर्षांपूर्वी नोंदणी असलेल्या बांंधकाम कामगारांना अनुदान मिळत नसल्याने कमालीचा असंतोष पसरला आहे. कामगार कल्याणकारी मंडळाने केवळ २०१३-१४ मध्ये नोंदणी झालेल्या कामगारांनाच अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याने जुन्या कामगारांनी आज, शनिवारी सहायक कामगार आयुक्त कार्यालयात अधिकाऱ्यांना जाब विचारला; पण याबाबत आदेश नसल्याने काही सांगू शकत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल्याने कामगार संतप्त झाले. हे अनुदान घेण्यासाठी आलेल्या कामगारांची पावसातही भली मोठी रांग लागली होती.
महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम कामगारांसाठी विविध योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
बांधकाम कामगारांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी महामंडळातर्फे शिष्यवृत्ती दिली जाते. त्याबरोबरच कामगारांना ब्लॅँकेट, चादर, मच्छरदाणी, सायकल, जेवणाचा डबा, चटई देण्याची घोषणा कामगारमंत्र्यांनी केली होती; पण या साहित्याऐवजी रोख रक्कम कामगारांना द्यावी, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली. त्यानुसार या कामगारांना तीन हजार रुपये साहित्य खरेदीसाठी देण्यात आले आहेत.
याचे वाटप सध्या सहायक कामगार आयुक्त कार्यालयाकडून सुरू आहे. जिल्ह्यात सुमारे पंधरा हजार नोंदणीकृत बांधकाम कामगार कार्यरत आहेत. कल्याणकारी मंडळाने केवळ २०१३-१४ या वर्षात नोंदणी झालेल्या कामगारांनाच अनुदानाचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे पहिल्यांदा नोंदणी झालेले कामगार अनुदानापासून वंचित राहिले आहेत. यामुळे
कामगारांमधून कमालीचा संताप व्यक्त होत असून, आज काही कामगारांनी सहायक आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांना जाब विचारत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. याबाबत कामगार आयुक्त सुहास कदम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)