कोल्हापूर : भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांना मोजणी प्रकरणाचा ताण कमी करावा, सर्व तांत्रिक कर्मचाऱ्यांना कमीत कमी २८ हजार रुपये दरमहा पगार मिळावा, आदी मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी भूमी अभिलेख विभागातील जिल्ह्यातील १८५ कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांचे काम बंद आंदोलन केले.
बुधवारी आंदोलनाची सांगता झाली. महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. दरम्यान, ऐन मोजणीच्या हंगामातच काम बंद आंदोलन केल्याने मोजणीच्या प्रलंबित प्रकरणाच्या संख्येत भर पडली आहे.भूमी अभिलेख कार्यालयात मोजणी, प्रशासकीय कामाच्या तुलनेत कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. यामुळे एकेका तांत्रिक कर्मचाऱ्याकडे दर महिन्याला १६ ते १७ प्रकरणे मोजणीसाठी येतात. याऐवजी १५ प्रकरणे एकेका कर्मचाऱ्यांकडे द्यावीत, सर्वच तांत्रिक कर्मचाऱ्यांना २८ हजार पेक्षा अधिक वेतन मिळावे, पूर्वीचे देय २५ दिवसांचे पगार मिळावे या मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत.
यामुळे काम बंद आंदोलन करून जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. आंदोलनात संघटनेचे महेश साळोखे, प्रशांत पाटील, प्रदीप जोंधळेकर, आदी सहभागी झाले होते.
सध्या मोजणीची प्रलंबित प्रकरणे तालुकानिहाय अशी
गगनबावडा ५३, आजरा २०१, शिरोळ १९०, चंदगड २१७, गडहिंग्लज २५३, राधानगरी २५३, कागल ३४०, भुदरगड ४४१, हातकणंगले ४००, पन्हाळा ५००.