कोल्हापुरात सारथीच्या १३० कोटींच्या इमारतीचे काम जोरात
By भीमगोंड देसाई | Updated: April 25, 2025 18:46 IST2025-04-25T18:45:42+5:302025-04-25T18:46:06+5:30
अकरापैकी ६ मजल्यांचे स्लॅब पूर्ण : राजाराम महाविद्यालय परिसरात बांधकाम

छाया-आदित्य वेल्हाळ
भीमगोंडा देसाई
कोल्हापूर : येथील राजाराम महाविद्यालय परिसरात छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेच्या (सारथी) उपकेंद्राची १३० कोटी ५५ लाखांची ११ मजली भव्य इमारतीचे बांधकाम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. पाचशे मुले आणि तितक्याच मुलींसाठी अत्याधुनिक सेवा, सुविधायुक्त इमारत बांधली जात आहे. एकूण अकरापैकी आतापर्यंत सहा मजल्यांची स्लॅब पडले आहे. मार्च २०२६ नंतर पूर्ण करण्याचे नियोजन सार्वजनिक बांधकाम प्रशासनाने केले आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांचा या इमारतीच्या मंजुरीच्या कामात, निधी उपलब्ध करून देण्यात मोठा वाटा राहिला आहे.
मराठा समाज आरक्षणासाठी वारंवार आक्रमक होत आहे. त्याची दखल घेऊन शासनाने राज्यातील मराठा, मराठा - कुणबी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासाठी काम करण्यासाठी पुणे येथे सारथी संस्थेची स्थापना जून २०१८ मध्ये स्थापन झाली. याचे उपकेंद्र २६ जून २०२१ पासून कोल्हापुरात सुरू आहे. उपकेंद्रासाठी शासनाने चार एकर जमीन शासनाने दिले. त्यावर फेब्रुवारी २०२४ पासून इमारत बांधकामचे काम पुण्यातील ठेकेदार कंपनी करीत आहे.
मराठा आंदोलनामुळे..
मराठा समाज वारंवार आरक्षणासाठी आक्रमक होत आहे. म्हणून या समाजातील विद्यार्थ्यांचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास सारथी संस्थेतर्फे करण्यात येणार आहे. आरक्षण मागणीची तीव्रताही या संस्थेच्या माध्यमातून केला जात आहे.
बांधकामाचे क्षेत्र - चौरस मीटरमध्ये
- उपकेंद्राचे प्रशासकीय इमारत : ६६२८.३८
- संग्रहालय, अभ्यासिका : ६१४९.४४
- मुलांचे वसतिगृह : ११४३३.७७
- मुलींचे वसतिगृह : १२३३२.८२
- भोजनगृह : २०४.८०
- इमारतीचे एकूण बांधकाम : ३६७४९.२०
२२ कोटींवर खर्च
मंजूर निधीपैकी २२ कोटी १५ लाख ४२ हजारांची शासनाकडून प्राप्त पैसे खर्च झाले आहेत. प्रलंबित देयके देण्यासाठी १५ कोटी निधीची आवश्यकता आहे. काम पूर्ण होईल, त्याप्रमाणे शासनाकडून निधी उपलब्ध होत आहे, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.
सारथी उपकेंद्राच्या भव्य इमारतीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ही वास्तू पूर्ण झाल्यावर तिथे विद्यार्थ्यांना कशा उत्तम सेवा-सुविधा देता येतील, असा आमचा प्रयत्न आहे. - किरण कुलकर्णी, सहव्यवस्थापकीय संचालक सारथी, कोल्हापूर.