श्री अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपाचे काम पावसाळ्यापूर्वी : केसरकर
By संदीप आडनाईक | Updated: March 19, 2023 15:02 IST2023-03-19T15:01:47+5:302023-03-19T15:02:29+5:30
आवारात छायाचित्रणाला तात्पुरती बंदी : शिवराज नाईकवडे यांची बदली महसूली कारणास्तव

श्री अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपाचे काम पावसाळ्यापूर्वी : केसरकर
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : श्री अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपाचे काम पावसाळ्यापूर्वी करण्याच्या सूचना दिल्याची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी पत्रकारांना दिली. श्री अंबाबाई मंदिरातील काम जोपर्यंत सुरु आहे, तोपर्यंत आवारात छायाचित्रणाला तात्पुरती बंदी केल्याची माहिती देउन देवस्थानचे सचिव शिवराज नाईकवडे यांची बदल महसूली कारणास्तव केल्याचा खुलासाही केसरकर यांनी केला.
पालकमंत्री दीपक केसरकर यांनी अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर केसरकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे कोल्हापूरसह सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरीत तीन हजाराहून अधिक मंदिरे आहेत. तेथील जमिनींबाबतचे प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित आहेत. अंबाबाई मंदिर, जोतिबा देवस्थानसह दोन हजारापेक्षा अधिक महसूली प्रश्नांच्या फाईल्स समितीकडे आहेत. या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी महसूल खात्यातील उपजिल्हाधिकाऱ्यांकडे देवस्थानचा कार्यभार दिल्याचे केसरकर यांनी सांगितले.
नाईकवडे यांना पुन्हा पोस्टिंग देता येईल
शिवराज नाईकवडे यांचे काम चांगले आहे. महसूली कारणास्तव त्यांची बदली केली आहे. त्यांची पुन्हा या जागेवर पोस्टिंग देता येउ शकते, असेही केसरकर म्हणाले.