महिला डॉक्टरची ‘क्लिप’

By Admin | Updated: January 10, 2016 01:11 IST2016-01-10T01:08:22+5:302016-01-10T01:11:47+5:30

डॉक्टरास अटक : मेडिकलच्या वसतिगृहात निद्राधीन अवस्थेतील चित्रीकरण

Women's doctor's 'clip' | महिला डॉक्टरची ‘क्लिप’

महिला डॉक्टरची ‘क्लिप’

कोल्हापूर : येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी वसतिगृहात प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरचे झोपलेल्या अवस्थेत मोबाईलद्वारे व्हिडिओ चित्रीकरण (क्लिप) व छायाचित्रे काढल्याप्रकरणी सीपीआरमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरास शनिवारी लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली. संशयित आरोपी डॉ. फणी किरण कोटा (वय ३१, रा. रंगारेड्डी, तेलंगणा) असे त्याचे नाव आहे. या घटनेने सीपीआरमध्ये खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले, येथील छत्रपती प्रमिलाराजे जिल्हा रुग्णालयाच्या (सीपीआर) पाठीमागील बाजूस राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थिनी वसतिगृह आहे. याठिकाणी प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरही राहतात. गुरुवारी (दि. ७) ड्युटी संपवून आल्यानंतर संबंधित महिला डॉक्टर आपल्या रूममध्ये कॉटवर विश्रांती घेत होत्या. त्यावेळी त्यांची अचानक खिडकीकडे नजर गेली असता तेथे मोबाईल लपविलेला दिसला. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर आजू-बाजूच्या डॉक्टर धावत रूममध्ये आल्या. या प्रकाराने महिला डॉक्टर घाबरून गेल्या. त्यांना इतर डॉक्टरांनी धीर देत शांत केले. त्यानंतर महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्याकडे या प्रकरणी तक्रार केली. चौकशीवरून हा मोबाईल संशयित डॉक्टर फणी कोटा याचा असल्याचे निष्पन्न झाले. पीडित महिला डॉक्टरने या प्रकरणी शनिवारी संबंधित डॉक्टरच्या विरोधात लक्ष्मीपुरी पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी मोबाईल तपासला असता त्यामध्ये पीडित डॉक्टर महिलेची झोपलेल्या अवस्थेतील छायाचित्रे व व्हिडिओ क्लिप आढळली. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक करून विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. काही दिवसांपूर्वी शेंडा पार्कातील याच महाविद्यालयाच्या वसतिगृहात मेडिकलचा विद्यार्थी जयंत रमेश तोंडे (वय २०, रा. मूळ गाव अहमदनगर, पाथर्डी) याला रॅगिंग करून मारहाण केली होती.
याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी संशयित आरोपी रूपेंद्रसिंग रामदाससिंग मीना, राहुलकुमार मीना, सुमित कुमार रॉय व राहुल रामकृष्ण जाजोरिया (सर्व रा. उत्तर प्रदेश) यांना अटक केली होती. त्यांच्यावर महाविद्यालयीन प्रशासनाने कारवाईही केली आहे. या प्रकरणाने राज्यभर खळबळ उडाली होती. हे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा डॉक्टर महिलेचे व्हिडिओ चित्रीकरण करण्याचा प्रयत्न झाल्याने महिला डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
चेहरा लपविण्याचा प्रयत्न
कोल्हापुरातील राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहात डॉक्टर महिलेची छायाचित्रे काढणाऱ्या व मोबाईलवर चित्रीकरण करणाऱ्या डॉ. फणी किरण कोटा या प्रशिक्षणार्थी डॉक्टरास शनिवारी पोलिसांनी अटक केली. त्यावेळी त्याने तोंड लपविण्याचा प्रयत्न केला.
फोन उचलला नाही
याप्रकरणी वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्याशी
वारंवार मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांनी फोन उचलला नाही.

Web Title: Women's doctor's 'clip'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.