महिलांचा आहार
By Admin | Updated: March 17, 2016 00:42 IST2016-03-17T00:41:36+5:302016-03-17T00:42:24+5:30
डॉ. शिल्पा जाधव

महिलांचा आहार
‘जागतिक महिला दिन’ नुकताच झाला. यानिमित्त यशस्वी महिलांचे सत्कार, स्त्रियांच्या समस्यांवर चर्चा, समान अधिकारांची मागणी, विविध मेळावे, निरनिराळ्या विषयांवर परिसंवाद, रॅलीज, वगैरे कार्यक्रम साग्रसंगीतपणे पार पडले. सध्या सर्वच क्षेत्रांमध्ये स्त्रिया हिरिरीने भाग घेत आहेत. प्रगती करत आहेत. राजकारण, शिक्षण, सरकारी नोकऱ्या, आदी सर्व ठिकाणी स्त्रियांसाठी आरक्षण आहे. बरं! यानंतर स्त्रियांना समान हक्क मिळाले का?
समाजाने जरी महिलांना स्वातंत्र्य, समान हक्क देऊ केले तरी ते उपभोगण्याची मानसिकता महिलांमध्ये आहे का, ही विचार करण्याची गोष्ट आहे. घराबाहेर सर्व क्षेत्रे काबीज करणाऱ्या स्त्रिया घरामध्ये स्वत:कडे कितीशा आदराने पाहतात? स्वत:चे आरोग्य, आवडीनिवडी यांना किती महत्त्व देतात? जरी अर्धे आयुष्य स्वयंपाकघरात जात असलं तरी सर्वांना वाढून उरेल तेच खायचं आणि काही वाया जाऊ नये म्हणून संपवायचं, या मानसिकतेतून आजची स्त्री एकविसावं शतक उजाडलं तरी बाहेर येत नाहीय. मी ज्या स्त्रियांना भेटले, आहारतज्ज्ञ म्हणून सल्ला दिला, त्यांच्या बोलण्यात ही असहायता स्पष्ट दिसत असते. घरातील मुलांच्या, नवऱ्याच्या आरोग्यविषयक समस्या उद्भवल्या, तर त्यासाठी काहीही करण्याची महिलांची तयारी असते; मात्र त्यांना स्वत:च्या जेवणाच्या वेळा, सवयी बदलण्यास सांगितल्या, तर त्यासाठी त्या असमर्थता दर्शवितात.
सकाळी झोपेतून जागे झाल्यापासून स्त्रियांच्या मनात घरातील कामांचे नियोजन, देवपूजा, स्वयंपाक, डबे, पाहुणे, बाजारहाट अशा कामांची यादी चालू असते. परंतु, त्यामध्ये आपण काय खाल्लं आहे, कधी खाल्लं आहे, हे मात्र त्या विसरून जातात अथवा त्याकडे दुर्लक्ष करतात. कितीतरी स्त्रियांच्या पोटात दुपारी बारा वाजेपर्यंत चहाशिवाय काहीही जात नाही. दुपारच्या जेवणानंतर काहीजणी कामासाठी बाहेर पडतात, तर काहीजणी झोप घेतात. परत संध्याकाळी टी. व्ही.समोर बसून काहीतरी अरबट चरबट खाणे होते. पुन्हा रात्री घरातील सर्व मंडळी येईपर्यंत वाट पाहायची आणि त्यानंतर रात्रीचे जेवण, असा साधारणपणे दिनक्रम असतो.
जेव्हा आपण सकाळी उठतो, तेव्हा आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी जागी होते. तिला भूकही लागलेली असते आणि तिला कामही करायचं असतं. त्यामुळे सकाळी उठल्याउठल्या लवकरात लवकर काहीतरी खाल्लं पाहिजे आणि चहा हे त्यावरचं उत्तर नाही. चहामुळे भुकेची भावना विरून जाते. आपण नाष्टा पुढे ढकलतो. सकाळी लवकर नाष्टा केल्यास दिवसभरात अचानक खूप भूक लागणे, पित्त होणे, मूडस् बिघडणे या गोष्टींचा त्रास होत नाही. नाष्ट्यामध्ये बाहेरून आणलेले ब्रेड, बिस्किटे वगैरे पदार्थ खाण्यापेक्षा घरी बनवलेल्या एखाद्या धान्याचा पदार्थ, दूध, फळ खाल्लेलं उत्तम!
दुपारच्या जेवणामध्ये भात, चपाती अथवा भाकरीसोबत हिरव्या पालेभाज्या, कढी, डाळी, उसळी, ताक किंवा दही, सॅलडस् अशा पदार्थांचा समावेश असू द्यावा. मुले, नवरा घराबाहेर आहेत किंवा तिकडेच जेवतात म्हणून कितीतरी स्त्रिया स्वत:साठी स्वयंपाक करण्याचा व खाण्याचा कंटाळा करतात. जेवणाची एखादी वेळ चुकविल्यास आपली दैनंदिन पोषणमूल्यांची गरज पूर्ण होणार नाही, हे लक्षात घ्यायला हवे. संध्याकाळी चिप्स, चिवडा या गोष्टींपेक्षा सुका मेवा, फळे, लाह्या, फुटाणे अशा पदार्थांचे सेवन करावे. रात्रीचा आहार शक्यतो हलका असावा. त्यामध्ये तळलेले पदार्थ, गोड पदार्थ, लोणची खाणे टाळावे. याउलट प्राणिजन्य प्रथिने (उदा. अंडी, मासे, चिकन) खाण्यासाठी संध्याकाळची वेळ योग्य ठरते. आपला आहार हे आपले इंधन आहे, हे ध्यानात घेऊन प्रत्येकाने आपल्या आहारविहाराची काळजी घेतली तर येणारा प्रत्येक दिवस महिला दिनच असेल; नव्हे महिला युगच असेल, हे निश्चित!!