अतुल आंबी
इचलकरंजी : येथील काळ्या ओढ्यात एका अनोळखी महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. गावभाग पोलिसांनी हा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात हलवला आहे. संबंधित महिलेचे वय अंदाजे ३० वर्षे असून लेगिन्स व ड्रेस परिधान केलेला आहे. पोलीस मृतदेहची ओळख पटवण्याचे काम करत आहेत. बुधवारी रात्री गावभाग पोलिसांना आमराई रोडवरील काळ्या ओढ्यामध्ये महिलेचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह ताब्यात घेऊन आय जी एम रुग्णालयात नेला. तेथून सकाळी कोल्हापूर सी पी आर रुग्णालयात हलवला. जिल्ह्यासह परिसरातील कर्नाटक भागातील पोलीस ठाण्यातही बेपत्ता नोंद असल्याबाबतची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. शरीरावर मारहाणीचे अथवा घातपाताचे व्रण दिसत नाहीत. शव विच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अधिक माहिती मिळणार आहे. सर्व शक्यता गृहीत धरून त्या दृष्टीने तपास सुरू आहे.