कोपार्डे : वेळेत उपचार न मिळाल्यामुळे करवीर तालुक्यातील बेंडाई धनगरवाडा येथील एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. शेतात काम करताना महिलेला चक्कर आली. रस्ता व रुग्णवाहिकेअभावी दवाखान्यात पोहोचण्यास उशीर झाला. वेळेवर उपचार होऊ शकले नाहीत, यामुळे महिलेचा मृत्यू झाला. दगडूबाई राजाराम देवणे (वय ५५) असे या महिलेचे नाव आहे. आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.कोल्हापूर शहरापासून अवघ्या २५ ते ३९ किलोमीटर अंतरावर डोंगरात बोलोली पैकी १२ वाड्या आहेत. येथे डोंगरात बेंडाई नावाने धनगरवाडा आहे. येथे जेमतेम दोनशे लोकसंख्या आहे. करवीर, पन्हाळा आणि राधानगरी तालुक्याच्या सीमेवर हे धनगरवाडे आहेत. या धनगरवाड्यांवर जाण्यासाठी पाचाकटेवाडी या गावातून सुमारे चार किलोमीटर अंतर डोंगरातून कच्चा रस्ता आहे. यामुळे येथील रहिवाशांना आरोग्यासाठी, मुलांना शिक्षणासाठी, जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी सांगरूळ, बोलोली असे आठ ते दहा किलोमीटरची पायपीट करावी लागते.रविवारी येथील दगडूबाई राजाराम देवणे या नेहमीप्रमाणे शेतात शेळ्या चारण्यासाठी गेल्या होत्या. भर उन्हात त्यांना चक्कर आली. ही माहिती वस्तीवर समजल्यानंतर नागरिकांची दगडूबाई यांना दवाखान्यात नेण्यासाठी धडपड सुरू झाली. रस्ताअभावी वाहनांची सोय नसल्याने दगडूबाईंना उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी खाटूलतून दगडधोंड्याच्या वाटेतून ठेचकळत अडीच-तीन तासांनंतर दगडूबाईंना घेऊन आलेले लोक पाचकटेवाडीत पोहोचली. यानंतर ॲम्ब्युलन्स, जीप उपलब्ध करण्यासाठी धडपड सुरू झाली. पाचकटेवाडी येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने अखेर खासगी वाहनाने रुग्णाला दोनवडे येथे खासगी दवाखान्यात आणण्यात आले. मात्र, उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या मागे पती, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे.
वेळेत उपचार न मिळाल्याने बेंडाईतील महिलेचा मृत्यू, आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 13:13 IST