कोल्हापूर : शिक्षक व समाजसेवक गिरीश फोंडे यांच्यावर राजकीय सूडबुद्धीने केलेल्या कारवाई विरोधात इंडिया आघाडी, विविध सामाजिक, शेतकरी आणि शैक्षणिक संघटनांनी गुरुवारी भवानी मंडपातून महानगरपालिकेवर मूक मोर्चा काढला. महापालिकेत आयुक्त मंजूलक्ष्मी यांनी निवेदन स्वीकारले. या आंदोलनाचे नेतृत्व माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार संपतबापू पवार यांनी केले.भवानी मंडप चौकात सकाळी ११ वाजता सभा झाली. सतीशचंद्र कांबळे यांनी प्रास्तविक केले. यावेळी माजी आमदार संपतबापू पवार म्हणाले, लोकशाहीत हुकूमशाही आणली आहे, त्यांना एकजुटीने धडा शिकवला पाहिजे. फोंडे हे निमित्त आहे, त्यांच्या माध्यमातून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याला ताकदीने उत्तर दिले पाहिजे. दडपशाहीचे आणि चुकीचे कायदे नेहमीच कोल्हापूरकरांनी हाणून पाडले आहेत. हा जनसुरक्षा कायदाही हाणून पाडू. चंद्रकांत यादव म्हणाले, नेहमी बिंदू चौकातून आंदोलन सुरू केले जाते परंतु शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या आणि अनेक आंदोलनाचे साक्षीदार असलेल्या भवानी मंडपातून या आंदोलनाला सुरुवात केली आहे. शेकापचे नेते बाबासाहेब देवकर म्हणाले, जनसुरक्षा विधेयकाची लिटमस टेस्ट म्हणून फोंडे यांच्यावर कारवाई केली आहे. अतुल दिघे म्हणाले, फोंडे यांच्यावर कारवाईच्या निमित्ताने लोकशाही अधिकारावर अंकुश ठेवण्याचे काम सुरू आहे. त्यांच्यावरचे निलंबन मागे घेतलेच पाहिजे. विजय देवणे म्हणाले, फोंडे यांचे निलंबन मागे घ्यावे, जर दडपशाही केली तर सत्तेवर बसू देणार नाही.मोर्चात रवी जाधव, संदीप देसाई, दगडू भास्कर, शिवानंद माळी यांचीही भाषणे झाली. स्वाती क्षीरसागर, सीमा पाटील, गीता हसूरकर, अनिल लवेकर, भरत रसाळे, राजेश वरक, कादर मलबारी, रघुनाथ कांबळे, बाबा महाडिक, दिलिप पवार, उत्तम पाटील, प्रकाश पाटील, प्राचार्य सुनीलकुमार लवटे, प्रभाकर हेरवाडे, शिवाजी परुळेकर, वसंत मुळीक, अवधूत पाटील, सुभाष जाधव, शिवाजी मगदूम, सम्राट मोरे. कृष्णात काेरे, अनिल चव्हाण, प्रशांत आंबी, अरुण यादव, अरुण व्हरांबळे, सचिन चव्हाण सहभागी झाले होते. शारंगधर देशमुख यांनी आभार मानले.
गिरीश फोंडेंवरील कारवाई मागे घ्या, कोल्हापुरात इंडिया आघाडीचा महापालिकेवर मूक मोर्चा
By संदीप आडनाईक | Updated: April 17, 2025 15:17 IST