आयुब मुल्लाखोची : माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्या शिंदेसेनेतील प्रवेशाने हातकणंगले तालुक्यातील राजकारणात शिंदेसेनेने बेरजेच्या राजकारणावर भर दिला असल्याचे स्पष्ट होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश पक्ष बळकटीसाठी हातभार लावेल. स्वतः मिणचेकर यांच्या राजकीय अस्तित्वासाठी हा प्रवेश महत्त्वपूर्ण ठरणार आहे.मिणचेकर यांचे खास तीन शिलेदार व अन्य ताकदीचे कार्यकर्ते मात्र त्यांच्याबरोबर गेलेले नाहीत.विधानसभेनंतर खासदार धैर्यशील माने हे राजकीय जोडण्या भक्कम लावण्यासाठी अधिक सक्रिय झाले आहेत. पारंपरिक विरोधाकडे दुर्लक्ष करीत त्यांनी पक्ष वाढीला महत्त्व दिले आहे. त्यातूनच त्यांनी स्वाभिमानीचे राजेश पाटील (हेरले) यांना पक्षात घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. पाटील हे कट्टर विरोधक असून, त्यांनाच समर्थक बनविले. त्यानंतर विरोधक असलेले सुजित मिणचेकर यांना पक्षात आणून आपले बेरजेचे राजकारण सुरू ठेवले.लोकसभेला हातकणंगले तालुक्यातून खासदार माने यांना चांगले मताधिक्य मिळाले होते. त्या आधारावर त्यांनी विधानसभेला ही जागा शिंदे गटाला मिळावी, म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. परंतु, त्यास यश आले नाही. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मात्र जास्तीच्या जागा निवडून आणण्याचा त्यांचा दृष्टिकोन आहे. जिल्हा परिषदेचे ११ व पंचायत समितीचे २२ मतदारसंघ आहेत. वर्चस्व निर्माण करण्यासाठी या निवडणुका जिंकणे प्रतिष्ठेच्या आहेत.माने, महाडिक, कोरे, आवाडे, यड्रावकर हे नेते महायुतीत आहेत. त्यांचे प्रत्येकाचे तालुक्यात गट आहेत. तालुक्याची रचना पाहता वेगवेगळ्या ठिकाणी या गटांची लक्षणीय ताकद आहे. अशा स्थितीत पक्ष संघटना मजबूत असेल, तरच जिल्हा परिषद निवडणुकीत अपेक्षित यश मिळविणे शक्य होणार आहे.
स्वाभिमानीतून आता शिंदेसेनेतमिणचेकर हे दोन वेळा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतून आमदार झाले. त्यानंतर काँग्रेसच्या आमदार राजू आवळे यांनी त्यांचा पराभव केला. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढविली. त्यांचा जनसुराज्य पक्षाचे उमेदवार अशोकराव माने यांच्याकडून दारुण पराभव झाला.
चौगुले, यादव, चव्हाण उद्धवसेनेतच..उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय चौगुले, जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण समितीचे माजी सभापती प्रवीण यादव, माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण हे मिणचेकर यांचे खंदे कार्यकर्ते आहेत. त्यांनी मात्र मिणचेकर यांच्याबरोबर जाण्याचे टाळले आहे. त्यांनी आहेत तेथेच राहण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.