Kolhapur: कोरोना काळात शिक्षकांनी दिवसाचा पगार दिला; सव्वा कोटी पडून, पॅथॉलॉजी लॅब कागदावरच
By समीर देशपांडे | Updated: July 4, 2025 13:20 IST2025-07-04T13:19:53+5:302025-07-04T13:20:33+5:30
महापालिकेची उदासीनता

Kolhapur: कोरोना काळात शिक्षकांनी दिवसाचा पगार दिला; सव्वा कोटी पडून, पॅथॉलॉजी लॅब कागदावरच
समीर देशपांडे
कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सामाजिक भान जपत जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि खासगी प्राथमिक शाळांच्या शिक्षकांनी एक दिवसाचा पगार आपत्कालीन निधीसाठी दिला. त्यातून येथील महापालिकेच्या आयसोलेशन रुग्णालयाच्यावर पॅथॉलॉजी लॅब उभारण्याचा निर्णय झाला. परंतु गेली साडेतीन वर्षे हा एक कोटी २० लाख रुपयांचा निधी पडून असून, ही लॅब कागदावरच आहे. याबाबत गेल्यावर्षी लोकसभा निवडणुकीआधी आमदार जयंत आसगावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लोकसभा निवडणुकीनंतर यासाठी बैठक घेणार असल्याचे सांगितले होते. परंतु, ती बैठकीही झालेली नाही.
पाच वर्षांपूर्वीच्या कोरोना काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली होती. पहिल्या लाटेत अनेक खासगी रुग्णालयांनी दारे बंद करून घेतली होती. दुसऱ्या लाटेत मात्र ती तातडीने उघडण्यात आली. याच दरम्यान महाराष्ट्र शासनाने सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार आपत्कालीन निधीसाठी घेतला होता.
दुसऱ्या लाटेत तर मोठ्या प्रमाणावर रुग्णांना जीव गमवावा लागला आणि त्यावेळच्या महागड्या चाचण्यांनी अनेकांचे कंबरडे मोडले होते. या पार्श्वभूमीवर तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील आणि आमदार जयंत आसगावकर यांनी जिल्ह्यातील सर्व शिक्षक संंघटनांची बैठक घेऊन एक दिवसाचा पगार देण्याचा निर्णय घेतला. या निधीतून महापालिकेच्या आयसोलेशन रुग्णालयाच्या वर प्रयोगशाळा उभारून या ठिकाणी किफायतशीर दरात विविध आरोग्य चाचण्यांची सुविधा देण्याचे नियोजन होते. परंतु, कोरोनाची तिसरी लाट संपली आणि त्यानंतर या निधीचाही विषय मागे पडला.
महापालिकेकडे वर्ग
हा निधी जिल्हा आपत्कालीन विभागाच्या खात्यावर पडून होता. महापालिकेने तो गतवर्षी मागवून घेतला. हा निधी आणि महापालिका शिक्षकांचा एक दिवसाचा पगार अशी रक्कम एक कोटी २० लाख रुपये होते. इतका निधी ज्यासाठी गोळा केला ते रोगनिदान केंद्र किंवा आरोग्य चाचण्यांचे सेंटर किंवा पॅथॉलॉजी लॅब मात्र अस्तित्वात आलेली नाही.
कोरोनानंतरच्या भविष्यकाळात सर्वसामान्य जनतेला कमी खर्चात सर्व प्रकारच्या आरोग्य चाचण्या करता याव्यात यासाठी तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी एक दिवसाचा पगार दिला होता. ज्या कारणासाठी हा पगार दिला, त्याची लवकरात लवकर पूर्तता व्हावी हीच आता अपेक्षा आहे. - प्रसाद पाटील, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना