बेळगावात ९ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन
By Admin | Updated: November 29, 2014 00:30 IST2014-11-29T00:19:20+5:302014-11-29T00:30:00+5:30
सुवर्ण विधानसौंध : प्रशासनाकडून जोरदार तयारी

बेळगावात ९ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन
बेळगाव : कर्नाटक सरकारचे दहादिवसीय हिवाळी अधिवेशन आगामी ९ डिसेंबरपासून बेळगाव येथील सुवर्ण विधानसौंध येथे भरणार आहे. राजधानी बंगलोरमधील अधिवेशनातील दहा दिवसांचे कामकाज बेळगाव येथे होणार असून, बेळगाव जिल्हा प्रशासनाने या अधिवेशनाची जोरदार तयारी सुरू केली आहे.
यासाठी ९ ते २० डिसेंबरपर्यंत शहरातील सर्व हॉटेल्स, मंगल कार्यालये बुक करण्यात आली आहेत. सर्व आमदार आणि सरकारी अधिकाऱ्यांची सोय हॉटेल आणि सभागृहांतून करण्यात येणार आहे.
कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नाच्या सुप्रीम कोर्टातील याचिकेच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरावर आपला हक्क सांगण्यासाठी कर्नाटक सरकार दरवर्र्षी हिवाळी अधिवेशन बेळगावात घेत असते. या अगोदर २००६ मध्ये पहिल्यांदा तत्कालीन कुमारस्वामी सरकारने एका केएलएलई शिक्षण संस्थेच्या इमारतीत बेळगावात पहिले अधिवेशन घेतले होते. त्यानंतर २००८ मध्ये दुसरे अधिवेशन जेएनएमसी मेडिकल कॉलेजमध्ये झाले होते. त्यानंतर २०१२ व २०१३ साली बेळगावातील हलगा येथे नवीन बांधलेल्या विधानभवनात घेण्यात आला होता. आता याच ठिकाणी हे अधिवेशन भरत आहे.
अधिवेशनाला विरोध म्हणून महाराष्ट्र एकीकरण समिती मराठी भाषिकांचा मेळावा भरवणारच आहे, शिवाय बेळगावच्या नामांतरविरोधात व मराठी भाषेतून सरकारी परिपत्रिके देण्याच्या मागणीसाठी हलगा येथील सुवर्ण विधानभवनासमोर आंदोलन करण्याचे समितीने जाहीर केले आहे. २०१४च्या मास्टर प्लॅनअंतर्गत बेळगाव शहराच्या चारही बाजूची ३० हजार एकर सुपीक जमीन कर्नाटक सरकार ताब्यात घेणार आहे. या विरोधातही मराठी भाषिक शेतकरी आंदोलन करणार आहेत.
अधिवेशनात गाजणार आंदोलन
अधिवेशनात काँग्रेस सरकारला घेरण्यासाठी भाजप नेते आंदोलन करणार असून, भाजपच्या नेत्यांची बैठक होत आहे. याशिवाय उसाला दर देण्यासाठी शेतकरी आंदोलन आणि बेळगावात केएटी कर्नाटक प्रशासकीय लवाद बेळगावात व्हावे, यासाठी वकिलांचेही बेमुदत बंद आंदोलन सुरू असून, या अधिवेशनात हे आंदोलन गाजणार आहे.