वाहतुकीच्या विविध अडचणींबाबत उपाययोजना करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:04 IST2021-01-13T05:04:08+5:302021-01-13T05:04:08+5:30

वाहतूक समितीची बैठक लोकमत न्यूज नेटवर्क, इचलकरंजी : शहरामध्ये विविध ठिकाणी अतिक्रमणे सुरू आहेत तसेच फूटपाथवरील अतिक्रमण, भटकी जनावरे, ...

Will take care of various transportation problems | वाहतुकीच्या विविध अडचणींबाबत उपाययोजना करणार

वाहतुकीच्या विविध अडचणींबाबत उपाययोजना करणार

वाहतूक समितीची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क, इचलकरंजी : शहरामध्ये विविध ठिकाणी अतिक्रमणे सुरू आहेत तसेच फूटपाथवरील अतिक्रमण, भटकी जनावरे, अवजड वाहनांची वाहतूक यासह विविध विषयांवर नागरिकांनी समस्या मांडल्या. यावर उपाययोजना सुरू करणार असून, पुन्हा दोन महिन्यांनी अशीच नियोजन व आढावा बैठक घेतली जाईल, अशी ग्वाही अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी दिली. शहर वाहतूक शाखेच्या आराखडा बैठकीवेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, शहरातील लोकसंख्या व तोकडे पोलीस संख्याबळ याचे गणित जुळत नाही. त्यामुळे थोडी गैरसोय होत आहे. त्यातून योग्य नियोजन करून रस्त्याकडेला धूळखात पडून असलेल्या वाहनांवर कारवाई करणे. निर्भया पथकाद्वारे शाळांमध्ये लक्ष ठेवणे, यासह नागरिक व समिती सदस्यांनी केलेल्या सूचनांसंदर्भात कार्यवाही सुरू करण्यात येईल.

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व छत्रपती शाहू पुतळ्याजवळ सिग्नल लावण्याची मागणी आहे तसेच ट्रक व मोठ्या वाहनांना पार्किंगसाठी जागा निश्चित करून त्याठिकाणी नियोजन करणे, मोकाट जनावरांसंदर्भात असलेला प्रश्न थोड्या दिवसांत मार्गी लावू, असे आश्वासन नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी दिले. फूटपाथवरील अतिक्रमण काढून संबंधितांवर कारवाई करणार असल्याचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी सांगितले.

रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांमुळे अनेकवेळा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. ‘धूम स्टाईल’ने वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक बाबूराव महामुनी यांनी दिली. बैठकीस प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक नंदकुमार मोरे, आदींसह शहापूर, गावभाग पोलीस ठाण्यांचे अधिकारी उपस्थित होते.

चौकट

बैठकीत शाब्दिक चकमक

ट्रान्स्पोर्ट असोसिएशनने नगरपालिकेकडे अवजड वाहनांना पार्किंगची सोय व्हावी, याकरीता जागा मागितली आहे. या कारणावरून ट्रान्स्पोर्ट असोसिएशन व नगरपालिका अधिकारी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. त्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत ट्रान्स्पोर्ट असोसिएशन व नगरपालिकाऱ्यांची बैठक लावून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.

(फोटो ओळी) १२०१२०२१-आयसीएच-०३ इचलकरंजी शहर वाहतूक शाखेच्या आराखडा बैठकीत अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संतोष खांडेकर, अलका स्वामी, बाबूराव महामुनी, विकास खरात, सं. ग. बोगरे उपस्थित होते.

(छाया-उत्तम पाटील)

Web Title: Will take care of various transportation problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.