राजीनामा देणार नाही : महापौर
By Admin | Updated: February 24, 2015 00:45 IST2015-02-24T00:40:29+5:302015-02-24T00:45:43+5:30
राष्ट्रवादीची ‘डेडलाईन’ शुक्रवारी संपणार

राजीनामा देणार नाही : महापौर
कोल्हापूर : ‘माझ्यावर अन्याय झाला आहे. राजीनाम्याबाबत यापूर्वीच भूमिका स्पष्ट केली आहे. राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही’, अशा शब्दांत महापौर तृप्ती माळवी यांनी राजीनाम्याच्या चर्चेला सोमवारी पूर्णविराम दिला. राष्ट्रवादी पक्षाने शुक्रवार (दि. २७)पर्यंत महापौरांनी राजीनामा न दिल्यास कारवाईचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर महापौरांनी भूमिका स्पष्ट केली.
आमदार हसन मुश्रीफ यांनी महापौरांना राजीनामा देण्याबाबत आठ दिवसांची मुदत दिली आहे. यासाठी रविवारी (दि. २२) राष्ट्रवादी नगरसेविकांचे शिष्टमंडळही त्यांना भेटले. मात्र, महापौर राजीनामा न देण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. महापौर माळवी राजीनामा न देण्यावर ठाम राहिल्यास शुक्रवारी त्यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी केली जाणार आहे. या कारवाईचा काहीही परिणाम महापौर पदावर होणार नसल्याने नेत्यांचीच गोची होणार आहे. शिवसेना-भाजपची आंदोलने व सभागृहात सत्ताधाऱ्यांचा विरोध सहन करीत महापौर कशा प्रकारे कारभार करणार याबाबत मनपा वर्तुळात उत्सुकता आहे.
लवकरच बजेटसाठी मनपाची सभा बोलविण्यात येणार असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले. महापौरांनी महासभा बोलाविल्यास त्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी घेतला आहे. सभा न झाल्यास प्रशासनासमोरील अडचणी वाढणार आहेत, तर येत्या आठ-नऊ महिन्यांत महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. शिल्लक व वाढीव निधी मंजूर करून प्रभागातील कामे मार्गी लावण्याकडे नगरसेवकांचा कल आहे. त्यामुळे महासभेवर बहिष्कार टाकल्यास निधी निर्गत होणे जिकिरीचे होईल.(प्रतिनिधी)
बुधवारी महासभा
महापालिकेची बुधवारी (दि. २५) नगरविकास विभागाच्या सूचनेनुसार सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण-२०११वर चर्चा करण्यासाठी महासभा बोलाविण्यात आली आहे.
यामध्ये प्रारूप याद्या प्रसिद्ध करून दावे व आक्षेप निकाली काढण्यासाठी प्रक्रिया व त्याचा कालावधी याबाबत जनतेला माहिती होण्यासाठी सभेत चर्चा केली जाणार आहे.
राज्य शासनाने बोलावलेली सभा घेणे अपरिहार्य आहे. त्यामुळे या सभेवर नगरसेवकांना बहिष्कार टाकता येणार नाही.
त्यामुळे नाइलाजाने कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना सभेला उपस्थित राहावे लागेल.