जयंतरावांपुढे सदाभाऊंच्या मंत्रिपदाची तुतारी वाजणार का?

By Admin | Updated: June 4, 2016 00:29 IST2016-06-04T00:20:05+5:302016-06-04T00:29:44+5:30

वाळवा-शिराळ्यातील चित्र : विरोधकांकडे कार्यकर्त्यांची वानवा असल्याने त्यांचे आव्हान तोकडे; आता तरी कार्यकर्त्यांना बळ मिळणार का?

Will he be a minister of the Sadbhau minister before Jayantra? | जयंतरावांपुढे सदाभाऊंच्या मंत्रिपदाची तुतारी वाजणार का?

जयंतरावांपुढे सदाभाऊंच्या मंत्रिपदाची तुतारी वाजणार का?

अशोक पाटील -- इस्लामपूर वाळवा-शिराळ्यात माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांच्या संस्थांची ताकद मोठी आहे. तेथील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कर्मचाऱ्यांच्या जोरावर प्रत्येक निवडणुकीत आ. पाटील बाजी मारतात. विरोधकांकडे कार्यकर्त्यांची वानवा असल्याने त्यांचे आव्हान तोकडे ठरते. आता ‘आमदार’ होणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सदाभाऊ खोत यांचीतरी ताकद वाढून आ. पाटील यांच्यापुढे सशक्त पर्याय निर्माण होणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
शिराळ्याच्या शिवाजीराव देशमुख यांनी कॅबिनेट मंत्री, विधान परिषदेच्या सभापतीपदापर्यंत मजल मारली. सध्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांनीही मंत्रीपद भूषविले आहे. माजी आमदार मानसिंगराव नाईक हेही आमदार होते. या मतदार संघातील राजकीय समीकरणे नेहमीच बदलतात. आता या मतदार संघातील, मात्र वाळवा तालुक्यातील सदाभाऊ खोत यांना भाजपने आमदारकी देऊन मंत्रीपदाचे आश्वासन दिले आहे.
वाळवा तालुक्यात मात्र वेगळे चित्र आहे. राजारामबापू पाटील यांनी उभ्या केलेल्या संस्था जयंत पाटील यांनी वाढवल्या आहेत. या तालुक्यातील अण्णासाहेब डांगे यांनी पाच वर्षे मंत्रीपद भूषविले. परंतु त्यांना कार्यकर्त्यांच्या रूपाने ताकद दाखवता आली नाही. तथापि सूतगिरणी व शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी पाय रोवले आहेत. हुतात्मा संकुलाचे संस्थापक क्रांतिसिंह नागनाथअण्णा नायकवडी आमदार झाले. त्यानंतर वाळवा व परिसरातील १५ गावांवर पकड मजबूत करून सहकार, शिक्षण क्षेत्रात त्यांनी प्रगती केली. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र वैभव नायकवडी यांनी सर्व सूत्रे हाती घेतली. मात्र त्यांची ताकद आ. पाटील यांच्यापुढे तोकडी पडत गेली. शिक्षकांच्या बळावर येलूरचे शिवाजीराव पाटील आणि इस्लामपूरच्या भगवानराव साळुंखे यांनी आमदारपद मिळवले, पण त्यांनी बांधलेल्या शिक्षक संघटनेची ताकद आता दिसत नाही.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी पश्चिम महाराष्ट्रात ऊसदर आंदोलन पेटवले होते. त्याचा शेतकऱ्यांना फायदाही झाला. या आंदोलनाला पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखानदारांचे नेते जयंत पाटील यांचा उघड विरोध होता. तरीही संघटनेने आंदोलन तीव्र केले. लोकसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना, आर.पी.आय., स्वाभिमानी व इतर पक्षांनी एकत्र येऊन महायुती केली. हातकणंगले मतदार संघातून राजू शेट्टी निवडून आले, परंतु माढ्यातून खोत पराभूत झाले. मोदी लाटेच्या जोरावर भाजपची सत्ता आली.
खोत यांचा निसटता पराभव झाल्याने त्यांना आमदार, मंत्रिपदाची संधी देण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. भाजपच्या नेत्यांनी दिलेला शब्द पाळला असून खोत यांना विधानपरिषदेची उमेदवारी मिळाली आहे. ते आमदार होतील, मंत्रीपदही मिळेल. परंतु वाळवा तालुक्यात प्राबल्य असलेल्या आ. पाटील यांच्यापुढे त्यांची ताकद कितपत चालणार, हे लवकरच दिसून येईल.

ऊस उत्पादकांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज
परिसरात ६0 ते ६५ टक्के शेतकरी ऊस उत्पादक आहेत. त्यामुळे उसाला दर मिळण्यासाठी ऊस उत्पादक लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांच्या पाठीशी राहतात, तर विधानसभेला आमदार जयंत पाटील यांना निवडून देतात. भाजपसोबत असलेल्या राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी यंदा ऊसदरप्रश्नी कसलेही आंदोलन केले नाही. त्यामुळे अद्याप कारखान्यांनी एफआरपीच्या रकमाही दिलेल्या नाहीत. त्यामुळे जयंत पाटील यांच्यापुढे स्वाभिमानीची ताकद तोकडीच पडणार आहे.

शिंदेंनी नेतृत्व स्वीकारले
शरद पवार यांच्या सरकारमध्ये वाळव्यातून पराभूत झालेले प्रा. एन. डी. पाटील, राजारामबापू पाटील मंत्री झाले. परंतु या दोघांना पराभूत करणारे विलासराव शिंदे आमदार होऊनही मंत्रिपदाविना राहिले. आता तर शिंदे हे जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहेत.

Web Title: Will he be a minister of the Sadbhau minister before Jayantra?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.