कोल्हापूर : जिल्ह्यातील पंचगंगेसह भोगावती, तुळशी, धामणी, कुंभी, जांभळी व कासारी या सात नद्यांची पूररेषा निश्चित करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. त्यासाठी ४ कोटी ६८ लाख रुपयांच्या निधीस मंजुरी देण्यात आली. पूररेषा निश्चित होईल परंतु त्यानुसार लागू केलेले निर्बंधांची कडक अंमलबजावणी होण्याची गरज तज्ज्ञांकडून व्यक्त झाली.
राष्ट्रीय हरित लवादाच्या पुणे बेंचमध्ये नद्यांच्या प्रदूषणाबाबत याचिके(२५-२०१४)मध्ये लवादाने अशा प्रकारची पूररेषा निश्चित करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाने ७ फेब्रुवारी २०२० ला या नद्यांची पूररेषा निश्चित करण्याबाबतचे पत्र दिले होते. या नद्यांच्या जलशास्त्रीय अभ्यास करून निषेधक (निळी) व नियंत्रक (लाल) पूररेषा निश्चिती व आखणी करण्यात येणार आहे. या कामासाठी ४ कोटी ६८ लाख ८७ हजार रक्कमेच्या अंदाजपत्रकास जलसंपदा विभागाने १ एप्रिल २०२१ ला मान्यता दिली आहे.
या सातही नद्यांची एकूण लांबी ३३८ किलोमीटर आहे. त्यातील एकट्या पंचगंगा नदीची श्री क्षेत्र प्रयागापासून नृसिंहवाडीपर्यंतची लांबी ७६ किलोमीटर आहे. यापूर्वी कोल्हापूर महापालिकेने शिवाजी पुलापासून शिरोली पुलापर्यंतची पंचगंगा नदीची पूररेषा निश्चित केली आहे. आता ती वगळून प्रयागापासून शिवाजी पूल व शिरोली पुलापासून ते नृसिंहवाडीपर्यंत नदीची पूररेषा निश्चित केली जाणार आहे. पूररेषा निश्चित केल्याने नदीच्या पात्रापासून किती अंतरापर्यंत बांधकामे करता येतील याची सीमारेषा निश्चित होते. त्याशिवाय भराव टाकून पात्र संकुचित करण्यावरही निर्बंध येतात. आता कोल्हापूर शहरवगळता पंचगंगेसह अन्य कोणत्याच नदीपासून किती अंतरापर्यंत बांधकामे करता येतील यासंबंधीचे फारसे निकष, नियम नाहीत. त्यामुळे एकदा ही नियमावली निश्चित झाल्यास सरसकट कुठेही बांधकामे करण्यावर किमान काही निर्बंध येतील. फक्त निश्चित केलेल्या पूररेषेशी सरकारी यंत्रणा किती प्रामाणिक राहते हेच महत्त्वाचे आहे.
राज्य शासनाने घेतलेला निर्णय नद्यांच्या सुरक्षतेसाठी व नदी व नदीचे पर्यावरण संरक्षणासाठी स्वागतार्ह आहे; परंतु एकदा पूररेषा निश्चित केल्यानंतर त्यासाठी निश्चित केलेल्या निर्बंधाची कडक अंमलबजावणी व्हायला हवी. अन्यथा नुसती कागदावर रेषा निश्चित करून फारसे काही पदरात पडणार नाही.
उदय गायकवाड
पंचगंगा प्रदूषण नियंत्रणासाठी उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीचे सदस्य