शिरोली : चारित्र्याच्या संशयावरून कासारवाडी घाटात पतीने पत्नीला चाकूने भोसकून खून करून कासारवाडीच्या डोंगरात टाकून दिले. यानंतर पती सोलापूर येथील फौजदार चावडी पोलिस ठाण्यात हजर झाला. शुभांगी सचिन रजपूत (वय २८, रा. कालबिलागी, ता. जमखंडी, बागलकोट) असे खून झालेल्या पत्नीचे नाव असून, सचिन चंद्रशेखर राजपूत (वय ३४, रा. कालबिलागी, ता. जमखंडी) असे आरोपी पतीचे नाव आहे. गुरुवारी घडलेली ही घटना शुक्रवारी (दि.६) सकाळी उघडकीस आली.घटनास्थळावरून आणि पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, आरोपी हा बागलकोट जिल्ह्यातील असून तो अहमदाबाद येथे भारतीय सैन्यदलात ८ वर्षे होता. त्याने एका महिलेसोबत अश्लील वर्तन केलेच्या कारणवरून त्याला सैन्यदलातून बडतर्फ केले होते, तसेच तो इतरत्र फिरत होता. पत्नी शुभांगी हिलासुद्धा त्रास देत असल्याने शुभांगी चार वर्षांच्या मुलासह माहेरी निलजी, ता. गडहिंग्लज येथे राहत होती. दोन महिन्यांपूर्वी आरोपी हा पत्नी शुभांगीला आणण्यासाठी गडहिंग्लजला गेला. तेथे शुभांगी, तिचे आई- वडील यांना मला शिरोली एमआयडीसीत नोकरी मिळाली आहे. मी आता चांगले वागतो, असे सांगून शुभांगीला घेऊन शिये येथे दीड महिन्यापासून राहायला आला होता. बुधवारी रात्री शुभांगीला सांगली येथे नातेवाइकांच्या लग्नाला जाण्यासाठी आईने फोन केला होता; पण सचिनने शुभांगीला फोन दिला नाही. यानंतर गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास जोतिबाला जाऊया, असे सांगून दोघे जण दुचाकीवरून जोतिबाला गेले. येताना कासारवाडी घाटात डोंगरात नेऊन शुभांगीच्या गळ्यावर दोन आणि पोटात दोन वार करून खून केला. शुभांगीला तिथेच टाकून हनुमाननगर शिये येथे घरी आला आणि तिथून दुचाकीवरून सोलापूर गाठले. सोलापूर फौजदार चावडी येथील पोलिस ठाण्यात शुक्रवारी सकाळी ७ वाजता हजर होऊन खुनाची कबुली दिली.यानंतर सोलापूर पोलिसांनी शुक्रवारी सकाळी शिरोली पोलिसांना संपर्क साधून याची माहिती दिली. शिरोली पोलिसांना संपूर्ण कासारवाडी डोंगर पालथा घातला; पण मृतदेह सापडला नाही. अखेर आरोपीने घटनास्थळावरील वर्णन सांगितल्यावर मृतदेह सापडला. यावेळी शुभांगीचे नातेवाईक उपस्थित होते.
बेसावध ठेवून वार केले..शुभांगी आणि सचिन दोघे जण गप्पा मारत बसले होते. यावेळी शुभांगी बेसावध असताना सचिनने शुभांगीच्या चेहरा, गळा व पोटावर चाकूने वार केल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास आले.