सेनापती कापशी : वडगाव (ता. कागल) येथे अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. शिवाजी बंडा शिंदे (वय ४७, रा. वडगाव) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी कांचन शिवाजी शिंदे व चंद्रकांत धोंडीबा शिंदे (रा. वडगाव) यांना ताब्यात घेतले आहे. आरोपी चंद्रकांत शिंदे हा मृत शिवाजीचा चुलतभाऊ आहे.
अधिक माहिती अशी, वडगाव फाट्याजवळ काशी नाका येथे रस्त्याच्या कडेला शिवाजी शिंदे याचा मृतदेह पहाटे फिरायला गेलेल्या नागरिकांना दिसला. ग्रामस्थ व पोलिस पाटील यांनी मुरगूड पोलिस ठाण्यास याबाबत कल्पना दिली. सुरुवातीला हा अपघात झाला असावा असे सर्वांना वाटले. पण घटनास्थळाची परिस्थिती पाहून पोलिसांनी चौकशी केली असता हा खून असल्याचे स्पष्ट झाले.
मृत शिवाजी याने फायनान्स कंपनीच्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल केली होती. या आर्थिक देवाण-घेवाणीतून पत्नी आरोपी कांचन हिच्यासोबत त्यांचे वारंवार वाद होत होते. गुरुवारी कापशीतील कामे संपवून शिवाजी वडगावकडे गेले होते. एकादशीनिमित्त वडगाव येथील मंदिरात भजन सुरू होते त्यामुळे रात्री उशिरापर्यंत ते मंदिराजवळच थांबले होते, असे ग्रामस्थांनी सांगितले.
दरम्यान, गुरुवारी रात्री अकरानंतर शिवाजी हा चुलतभाऊ आरोपी चंद्रकांत याच्या गाडीवरून गेला असल्याची माहिती खबऱ्याकडून पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी चंद्रकांत याला ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. दोघांनी शिवाजीला निर्जनस्थळी नेऊन लाकडी ओंडक्याने मारहाण करून त्याचा खून केला. आरोपींनी पुरावा व ओळख नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह वडगाव येथील काशी नाका येथे रस्त्याकडेला टाकला असल्याचे पोलिसांना सांगितले.मुरगूडचे पोलिस निरीक्षक शिवाजी करे व पोलिसांनी आठ तासात खुनाचा छडा लावून आरोपी कांचन व आरोपी चंद्रकांत शिंदे यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला.