कोल्हापूर : विशाळगडाच्या पायथ्याला गजापूर आणि मुसलमानवाडीत झालेल्या हिंसेनंतर पोलिसांनी जाणीवपूर्वक भारतीय न्याय संहिता कलम १५२ नुसार गुन्हा दाखल केला नाही. काही संशयितांची नावे वगळली. त्यामुळे वाढीव कलमाचा समावेश करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी इंडिया आघाडीने निवेदनाद्वारे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे बुधवारी (दि. २४) केली. घटना घडून ११ दिवस उलटले तरी तपासाला गती का नाही? असा सवाल इंडिया आघाडीने उपस्थित केला.विशाळगडावरील अतिक्रमणे हटवण्याच्या मुद्द्यावरून काही संघटनांनी १४ जुलैला गजापूर आणि मुसलमानवाडीत हिंसा केली. त्या घटनेनंतर पोलिसांनी शाहूवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून २४ संशयितांना अटक केली. मात्र, अजूनही हिंसेचे सूत्रधार रवींद्र पडवळ आणि बंडा साळोखे यांना अटक झालेली नाही. याबाबत इंडिया आघाडीने बुधवारी विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची भेट घेऊन तपासाबद्दल नाराजी व्यक्त केली.ॲड. बाबा इंदुलकर यांनी कलम १५२ नुसार गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांनी टाळल्याचा आरोप केला. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय देवणे, राष्ट्रवादीचे आर. के. पोवार यांनी तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत तातडीने दोषींना अटक करण्याची मागणी केली. यावेळी इंडिया आघाडीचे संजय पवार, चंद्रकांत यादव, दिलीप पवार, सतीशचंद्र कांबळे, गणी आजरेकर आदी उपस्थित होते.गुन्हे मागे घेऊ नयेतहिंसा करणाऱ्यांना शिवभक्त संबोधून त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याची मागणी काही नेत्यांकडून होत आहे. मात्र, गुन्हे मागे घेऊन कोणालाही पाठीशी घालू नये. उलट हिंसेला प्रोत्साहन देणारे आणि जमावबंदी असतानाही तरुणांना विशाळगडाच्या पायथ्याला येण्याचे आवाहन करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी आघाडीने केली.राष्ट्रपतींच्या भेटीची वेळ मागणारहिंसेचा तपास योग्य पद्धतीने व्हावा, याची मागणी करण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार असल्याचे इंडिया आघाडीच्या नेत्यांनी सांगितले. मुर्मू यांच्या कौल्हापूर दौऱ्यात पोलसांनी भेटीसाठी वेळ द्यावी, असे आवाहन ॲड. इंदुलकर यांनी केली.
Kolhapur: विशाळगड हिंसेचा तपास का रखडला?; इंडिया आघाडीचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 16:00 IST