शासनाने आदेश देऊनही फेरचौकशी का करत नाही?: हसन मुश्रीफ
By Admin | Updated: March 9, 2017 18:50 IST2017-03-09T18:50:35+5:302017-03-09T18:50:35+5:30
कागल तालुक्यातील २३०० अपात्र लाभार्थ्यांचे अनुदान सुुरु ठेवण्याची मागणी

शासनाने आदेश देऊनही फेरचौकशी का करत नाही?: हसन मुश्रीफ
शासनाने आदेश देऊनही फेरचौकशी का करत नाही?: हसन मुश्रीफ यांनी विचारला जिल्हाधिकाऱ्यांना जाब :
कागल तालुक्यातील २३०० अपात्र लाभार्थ्यांचे अनुदान सुुरु ठेवण्याची मागणी
कोल्हापूर : कागल तालुक्यातील संजय गांधी, श्रावणबाळ, इंदिरा गांधी या योजनांच्या लाभार्थ्यांना शासन निर्णय, परिपत्रके डावलून नियमबाह्य निकष लावून सुमारे २३०० लाभार्थ्यांना अपात्र ठरवून त्यांचे अनुदान बंद केले आहे. या संदर्भात शासनाकडे पाठपुरावा करून याच्या फेरचौकशीचे आदेश आणले आहेत. याकरिता तुम्हाला वर्षभरात अनेक वेळा भेटूनही तुम्ही चौकशी केलेली नाही. तुम्ही शासनाचा अपमान करता काय? अशा शब्दांत आमदार हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांना जाब विचारला.
दुपारी एकच्या सुमारास आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली कागल तालुका राष्ट्रवादी कॉँगे्रसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.
यावेळी मुश्रीफ यांनी कागल तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेसह विविध योजनांच्या लाभार्थ्यांचे अनुदान चुकीचे निकष लावून बंद करण्यात आले आहे. ही बाब आपण शासनाच्या निदर्शनास आणून देत ३ मार्च २०१६ रोजी फेरचौकशीचे आदेश आणले आहेत; परंतु अद्याप यावर कोणतीच कार्यवाही झालेली नाही. ती केव्हा करणार? अशीही विचारणा केली.
यावर जिल्हाधिकारी सैनी यांनी या संदर्भात भुदरगडच्या प्रांताधिकाऱ्यांमार्फत दोन वेळा चौकशी करण्यात आली आहे. हे करीत असताना कागल तालुक्यात दोन हजारांहून अधिक जणांचे मोर्चे काढून यंत्रणेवर दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा सर्व लाभार्थ्यांची फेरचौकशी शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जर त्रुटी असतील तर अशी प्रकरणे निदर्शनास आणून द्या, त्यांची चौकशी केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
यावर मुश्रीफ यांनी आम्ही ३००० लोकांमधून ही नावे शोधून काढायची काय? हे तुमचे काम आहे; त्यामुळे तुम्ही फेरचौकशी करावी, असे सांगितले. आम्ही महात्मा गांधींचे अनुयायी असल्याने कुणावरही दबाव आणण्याचा प्रश्नच येत नाही. तसे वाटल्यास तुम्ही चौकशी बंद करू शकता. फेरचौकशीसाठी शासनाकडून आदेश आणून वर्षभरात मी आपल्याला अनेक वेळा भेटलो. वेळोवेळी निवेदने, मोर्चे, आंदोलने केली आहेत; परंतु यावर कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.
शिष्टमंडळात जिल्हा बॅँकेचे संचालक प्रताप माने, जिल्हा परिषदेचे सदस्य युवराज पाटील, मनोज फराकटे, कागलच्या नगराध्यक्षा माणिक माळी, उपनगराध्यक्ष नितीन दिंडे, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, शशिकांत खोत, रमेश तोडकर, सुभाष चौगले, विकास पाटील, आदींचा समावेश होता.
-------------------------
अजूनही आम्ही संयमात....
मी पाच वेळा आमदार व दोन वेळा मंत्री असूनही माझ्यासारख्या माणसाला तुम्ही एवढा वेळ लावत आहात, हे बरोबर नसून अजूनही आम्ही संयमात आहोत, हे विसरू नका अशा शब्दांत मुश्रीफ यांनी संताप व्यक्त केला.
---------------------------------------
इथेच भडका उडेल
जिल्हाधिकाऱ्यांशी हसन मुश्रीफ चर्चा करीत असताना जिल्हाधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने मुश्रीफ संतप्त झाले होते. त्यात मध्येच कुणीतरी बोलण्याचा प्रयत्न केला. यावर मुश्रीफ यांनी त्यांना रोखत ‘मी बोलतो आहे; त्यामुळे कुणीही मध्ये बोलू नका,’ असे सांगत ‘आता इथेच भडका उडेल,’ असे म्हणत जिल्हाधिकाऱ्यांकडे कटाक्ष टाकला.